अजित पवार विमान अपघात प्रकरण : डोर्लेवाडीत बंद; सखोल चौकशीची मागणी
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 31 views
बारामती : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असून अपघात की घातपात, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, या मागणीसाठी बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गाव आज बंद ठेवण्यात आले.
यापूर्वी रविवारी बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावातही बंद पाळण्यात आला होता. लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र देत विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. आता डोर्लेवाडीतील ग्रामस्थांनीही याच मागणीसाठी एकदिवसीय बंद पुकारला आहे.
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची निवेदनाची तयारी
बारामतीतील प्रशासकीय भवनाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे कार्यकर्ते एकत्र जमले असून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्याची तयारी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर अपघातात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने या घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
कार्यकर्त्यांच्या मते, विमान अपघातातील काही बाबी संशयास्पद असून सत्य बाहेर येणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय यंत्रणेकडून करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे मांडण्याची भूमिका घेतली आहे.
अधिवेशनात शोकप्रस्ताव
दरम्यान, मुंबईत सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्व. अजित पवार यांच्या स्मरणार्थ विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीनुसार विधानसभा अध्यक्षांकडून हा प्रस्ताव मांडला जाईल. मात्र, विविध पक्षांतील सदस्यांनी मनोगत व्यक्त करण्याची इच्छा दर्शविल्याने शोकप्रस्तावावर विशेष चर्चा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे गटनेते तसेच प्रत्येक पक्षातील किमान तीन सदस्य सभागृहात भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या अपघाताच्या चौकशीबाबतची मागणी आता ग्रामीण भागातही तीव्र होताना दिसत आहे.
