चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले!

माजी आमदार रमेशभाई कदम थेट रिंगणात; सुरेखा खराडे, बाबू तांबे, बाळा कदम, लियाकत शहा, मिलिंद कापडी यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत

 योगेश बांडागळे
चिपळूण :
जवळपास नऊ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून, कोकणातील सर्वाधिक चर्चेची आणि लक्षवेधी अशी चिपळूण नगर परिषदेची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची, गमतीशीर आणि मुद्देसूद लढत देणारी ठरणार आहे. या निवडणुकीत माजी आमदार रमेशभाई कदम यांनी थेट रिंगणात उतरण्याचा घेतलेला निर्णय राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारा ठरला आहे.

आमदारकीनंतर नगराध्यक्षपदाकडे वाटचाल

रमेशभाई कदम यांच्या निर्णयाने या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदारपद भूषविलेल्या व्यक्तीने पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरावे का, असा प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत. मात्र शहराच्या विकासासाठी, प्रशासकीय कारभारामुळे गेल्या काही वर्षांत झालेल्या नगर परिषदेच्या अधोगतीला थांबवण्यासाठी, पुन्हा एकदा रमेशभाईंसारखे अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्व हवे, अशी भावना अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

थेट नगराध्यक्ष पदाची लढत — ऐतिहासिक निवडणूक

यावेळी चिपळूण नगर परिषद निवडणूक थेट नगराध्यक्ष पदासाठी होत असल्याने उत्सुकता आणि उत्साह दोन्ही तितकेच मोठे आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असून, प्रत्येक पक्षातून नगराध्यक्षपदासाठी मोठी हालचाल सुरू झाली आहे.
मागील निवडणुकीत थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या भाजपच्या सुरेखा खराडे यांनी पुन्हा इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत नगर परिषदेच्या कामकाजात सुधारणा झाल्याची छाप राज्यभरात उमटली होती. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून दिग्गजांची रांग

महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेकडून बाळा कदम, काँग्रेसकडून लियाकत शहा, आणि शरद पवार राष्ट्रवादीकडून खुद्द जाणते राजे रमेशभाई कदम रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे महायुतीकडून शिंदे गट शिवसेनेचे उमेश सकपाळ, तर भाजपकडून कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, सहकार अशा विविध क्षेत्रांत कार्यरत मंगेश उर्फ बाबू तांबे हे प्रबळ इच्छुक आहेत. त्यांच्यासह रसिका देवळेकर आणि नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले शशिकांत मोदी हेही इच्छुकांच्या यादीत आहेत.
दरम्यान, अजितदादा पवार राष्ट्रवादीकडून मिलिंद कापडी यांचे नाव पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर आघाडी व युतीचे अंतिम गणित ठरणे ही आगामी निवडणुकीची दिशा ठरवणारी बाब ठरणार आहे.

शहरभर राजकीय चर्चांचा जोर

चिपळूणमध्ये सध्या प्रत्येक हॉटेल, चहाचे टपरे, बाजारपेठा आणि नाक्यांवर राजकीय चर्चा रंगल्या आहेत. "महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये युती होईल का?" हा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
सकाळी आणि संध्याकाळी चहाच्या टपरीवर सुरू असलेल्या या चर्चांमधून येत्या काही दिवसांत शहरात तीव्र राजकीय हालचाली घडण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे.

भास्करराव जाधव – रमेशभाई कदम : जुने शत्रू, नवे समीकरण

या निवडणुकीतील सर्वात रोचक आणि चर्चेचा विषय म्हणजे भास्करराव जाधव आणि रमेशभाई कदम यांच्यातील समीकरण. अनेक वर्षे हे दोघे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जात असले तरी, सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे दोघेही महाविकास आघाडीत आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील वैर कमी झाल्याचे दिसून येत असून, एकमेकांविषयी ते सावध भाषेत बोलताना दिसतात. त्यामुळे रमेशभाई कदम थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले, तर भास्करराव जाधव नगरसेवक पदांच्या वाटपात त्यांना मदत करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे किंवा भास्करशेठ जाधव आपले सहकारी मोहनशेठ मिरगल यांच्यासाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी आग्रही राहू शकतात. त्यामुळे चिपळूणमध्ये आता “मैत्रीपूर्ण लढत की थेट सामना?” हा प्रश्न अधिकच गडद होत आहे.

इनायतभाई मुकादम यांचंही नाव चर्चेत

नगर परिषदेच्या विषयात सखोल अभ्यास असलेले माजी स्वीकृत नगरसेवक इनायतभाई मुकादम यांचं नावही थेट नगराध्यक्ष पदासाठी घेतले जात आहे. त्यांच्या कार्यशैलीचा व अभ्यासाचा मोठा लौकिक असून, अनेक नागरिक त्यांनाही पाठिंबा देतील, अशी चर्चा आहे.

निवडणुकीआधीच तापलेलं राजकारण

अजून निवडणुकीची अधिकृत घोषणा व्हायची आहे; परंतु शहरात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
नवरात्रोत्सवानंतर दिवाळीच्या उंबरठ्यावर आता चिपळूणमध्ये ‘राजकारण आणि फक्त राजकारण’ या चर्चेतच सर्वत्र तापमान वाढले आहे. शहराच्या विकासाचा मुद्दा, जुनी वैरं, नवे चेहरे, बदललेले समीकरण आणि पक्षांतरांची हालचाल यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार असल्याची सर्वांचीच खात्री आहे.
 

संबंधित लेख