जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दुर्वांक शिंदे यांचे घवघवीत यश

चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार, सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) येथील विद्यार्थी कु. दुर्वांक अविनाश शिंदे याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.

घरात हवेत आजी-आजोबा” या विषयावर दुर्वांक शिंदे याने अत्यंत अभ्यासपूर्ण, ओघवत्या व प्रभावी शैलीत भाषण सादर केले. या स्पर्धेसाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

दुर्वांक शिंदे हा शाळेच्या विविध वक्तृत्व व अन्य स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवणारा विद्यार्थी असून, मागील वर्षीदेखील याच स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाही त्याने आपल्या वक्तृत्व कौशल्याची छाप पाडत शाळेच्या लौकिकात भर घातली आहे.

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सौ. अपूर्वा शिंदे यांनी करून घेतली.

दुर्वांक शिंदे यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व लोकप्रिय आमदार मा. शेखरजी निकम साहेब, सेक्रेटरी श्री. महेश महाडिक सर, सर्व संचालक मंडळ, शाळेच्या विविध समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालकांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.

संबंधित लेख