हिंदुत्वाचे स्फुल्लिंग पेटते ठेवावे : सुशील कुलकर्णी

पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवाला रत्नागिरीत थाटात सुरुवात

रत्नागिरी : हिंदू धर्म हाच खरा राष्ट्रधर्म असून तो राष्ट्राशी प्रामाणिक राहायला आणि राष्ट्र उभे करायला शिकवतो. कीर्तनसंध्या महोत्सवाच्या माध्यमातून सुरू असलेल्या धर्मजागृतीत तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग कौतुकास्पद आहे. हिंदू धर्मावरचे प्रेम, निष्ठा, योगदान आणि हिंदुत्वाचे हे स्फुल्लिंग असेच पेटते ठेवावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध यू-ट्यूबर व पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी केले.

पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवाचा प्रारंभ ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी झाला. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून या महोत्सवात सुशील कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून धर्मजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली तसेच महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या तरुणाईबद्दल समाधान व्यक्त केले.

या महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या रसाळ, सुश्राव्य वाणीतून ‘महाभारत (उत्तरार्ध)’ या विषयाची उकल सुरू झाली आहे.

महोत्सवाचे उद्घाटन चारुदत्तबुवा आफळे यांच्यासह पितांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, देसाई उद्योगसमूहाचे जयंतराव देसाई, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, रत्नागिरी पोलीस निरीक्षक श्री. पाटील व कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. श्री गणपती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनानंतर ब्रह्मवृंदाच्या मंत्रपठणाने भारावलेल्या वातावरणात कीर्तनाला सुरुवात झाली.

यावेळी मागील वर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवातील आख्यानाचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला. पांडवांच्या खांडववनाचा प्रसंग, बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर हस्तिनापुरासह राज्य परत देण्याची धृतराष्ट्राची कबुली, मात्र तेरा वर्षांनंतरही दुर्योधनाच्या माध्यमातून केलेली टाळाटाळ आणि त्यासाठी सुरू झालेली कृष्णशिष्टाई हे प्रसंग बुवांनी प्रभावीपणे मांडले.

पूर्वरंगानंतर मध्यंतरात पितांबरी उद्योगसमूहाचे रवींद्र प्रभुदेसाई यांचा चारुदत्तबुवा आफळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पहिल्या वर्षापासून कीर्तनसंध्याचे आधारस्तंभ असलेल्या प्रभुदेसाई यांना त्यांच्या योगदानाबद्दल योगेश्वर श्रीकृष्णाची भव्य प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. याचवेळी आफळेबुवा, प्रभुदेसाई, सुशील कुलकर्णी व कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते कोकण मीडियाच्या कीर्तनसंध्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकात कीर्तनसंध्याच्या वाटचालीचा आढावा तसेच महाभारतावरील धनंजय चितळे यांची १८ भागांची लेखमाला एकत्रितरीत्या प्रकाशित करण्यात आली आहे.

महोत्सवात पितांबरी कंपनीने विकसित केलेल्या वन्यप्राणिरोधक (मंकी अँड वाइल्ड अॅनिमल रिपेलंट) औषधाचेही उद्घाटन करण्यात आले. याबाबत माहिती देताना रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले की, पितांबरी ग्राहकांना देव मानते. आंबा हंगामात शेतकऱ्यांना माकडांसह अन्य वन्यप्राण्यांपासून होणारा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने हे औषध विकसित करण्यात आले आहे. लेमनग्रास, सिट्रोनेला, लसूण, गोमूत्र अर्क यांसारख्या तीव्र वासाच्या घटकांपासून तयार करण्यात आलेले हे औषध बिनविषारी असून एक लिटर औषध वीस लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास आठ ते दहा दिवस वन्यप्राणी दूर राहतात, असा अनुभव आहे.

यावेळी सुशील कुलकर्णी म्हणाले, “माणसातील माकडे आणि हिंदुत्वाला उपद्रव करणाऱ्या प्रवृत्ती घालवण्याचे औषध आफळेबुवा कीर्तनाच्या माध्यमातून देत आहेत. आपला सनातन हिंदू धर्म डौलाने आणि अभिमानाने पुढे जात राहो.”

कीर्तनसंध्या २०२६ मध्ये नामवंत कलाकारांची प्रभावी साथसंगत लाभत असून त्यामध्ये तबला – केदार लिंगायत, पखवाज – मंगेश चव्हाण, ऑर्गन – चैतन्य पटवर्धन, व्हायोलिन – उदय गोखले, तालवाद्य – हरेश केळकर, बासरी – मंदार जोशी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर करत आहेत.

कीर्तन महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून देणगी सन्मानिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध आहेत. इतिहास, भक्ती, विचार आणि संस्कार यांचा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अवधूत जोशी (९०११६६२२२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

संबंधित लेख