मोहन विद्यालयाचे मुख्याध्यापक संजु वाघमारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
- by Yogesh Bandagale
- October 23, 2025
- 110 views
दसपटी (चिपळूण) : दसपटीतील अग्रगण्य शैक्षणिक संस्था मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजु रामचंद्र वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सदर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ २५ व २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर येथे मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आयोजित करण्यात आलेला असून, रविवार, २६ ऑक्टोबर रोजी हा सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे कार्याध्यक्ष आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, अध्यक्ष श्री. तानाजी माने, सचिव श्री. नंदकुमार सागर यांच्यासह उपाध्यक्ष, सहसचिव, संपादक, सहसंपादक, कोषाध्यक्ष, विद्यासचिव, राज्य प्रवक्ता, तसेच प्रमुख मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका यांची उपस्थिती राहणार आहे.
आकले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. संजु वाघमारे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळा कमिटीचे चेअरमन, चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती बळीराम दादा शिंदे आणि कमिटीचे सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे.
