युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये घडलेले संस्कारच माझ्या यशाचा पाया:नगराध्यक्ष
- by Yogesh Bandagale
- December 30, 2025
- 316 views
चिपळूण : “युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये मी घडलो, इथेच माझ्यावर जीवनाचे संस्कार झाले. आपण जे कमावतो त्यातील काहीतरी समाजाचे देणे लागतो, ही शिकवण मला माझ्या शिक्षकांकडून मिळाली. सामान्य घरातील मुलगा ते आज नगराध्यक्ष, असा माझा प्रवास झाला असून या यशामध्ये युनायटेड इंग्लिश स्कूलचा मोठा वाटा आहे,” अशी भावना चिपळूणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. उमेश धोंडीराम सकपाळ यांनी व्यक्त केली.
परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी, उपकार्याध्यक्ष राजीव कानडे, शाळा समितीचे चेअरमन विजय चक्रदेव, सेक्रेटरी श्री. मोने, संचालक सुनील जोशी, नगरसेवक संदीप भिसे, कपिल शिर्के, निहार कोवळे, संचालिका व नगरसेविका वैशाली निमकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, रेवती कारदगे, तसेच माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगेश मोने यांनी पारंपरिक गाऱ्हाणे घातल्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. या वेळी बोलताना मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या नगराध्यक्ष उमेश सकपाळ व नवनिर्वाचित नगरसेवकांचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने सन्मान केला. त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आपल्या मनोगतात नगराध्यक्ष उमेश सकपाळ म्हणाले, “आज या व्यासपीठावर उभा राहिल्यावर शालेय जीवनातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो. चिपळूणचा प्रथम नागरिक होण्याचा मान मला लाभला, पण या शाळेचे ऋण कधीही फेडता येणार नाही. शाळेसाठी जे काही लागेल, जे काही कमी पडेल ते देण्यासाठी मी सदैव तयार आहे.”
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील हर्षद भडभडे यांनीही माजी विद्यार्थी या नात्याने शाळेस सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली असल्याचे श्री. सकपाळ म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक ‘पंचतुंड’ नांदीने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी स्नेहसंमेलन अधिकच रंगतदार झाले.
...............................................
युनायटेड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात चिपळूणचे नगराध्यक् श्री. उमेश सकपाळ यांचा सन्मान करताना संस्थेचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी, नगरसेवक संदीप भिसे, निहार कोवळे, वैशाली निमकर, उपकार्याध्यक्ष राजीव कानडे, श्री. मोने व अन्य मान्यवर.
