कार्तिकी व वरा देवळेकर बहिणींनी पटकावला ‘भारतीय प्रख्यात नेमबाज’ किताब

रत्नागिरी : दिल्ली येथील डॉ. कर्णिसिंग शूटिंग रेंज येथे १६ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत (68th National Shooting Championship) कार्तिकी मानस देवळेकरवरा मानस देवळेकर या बहिणींनी आपल्या अचूक आणि सातत्यपूर्ण नेमबाजीच्या जोरावर ‘भारतीय प्रख्यात नेमबाज’ (Renowned Shooter) हा मानाचा किताब पटकावला आहे.


शॉटगन क्ले पिजन डबल ट्रॅप – यूथ वुमन या श्रेणीत हा किताब मिळवणाऱ्या त्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्याच महिला खेळाडू ठरल्या आहेत.

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या शॉटगन प्रकारात त्यांनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ही कामगिरी साध्य केली. यापूर्वी जिल्ह्यातील कोणत्याही महिला खेळाडूला या श्रेणीत असा सन्मान मिळालेला नसल्याने या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, ११ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत देखील दोघींनी उल्लेखनीय कामगिरी केली. ५० मीटर रायफल प्रोन – यूथ वुमन या प्रकारात दोघींनी पुन्हा एकदा ‘भारतीय प्रख्यात नेमबाज’ हा किताब पटकावला. या स्पर्धेत वरा देवळेकर हिने ५९४.२ गुण, तर कार्तिकी देवळेकर हिने ५९९ गुण मिळवून २०२६ भारतीय संघ निवड चाचणीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

या यशामागे प्रशिक्षक मोहनीश नंदकुमार हिरवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच केसरी सिंग भाटी सर आणि जितेंद्र सिंग चौहान सर यांचेही वेळोवेळी विशेष मार्गदर्शन मिळाले असल्याचे खेळाडूंनी सांगितले.

भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून पदक जिंकण्याचे ध्येय या दोन्ही बहिणींनी व्यक्त केले आहे. कार्तिकी व वरा या रत्नागिरी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षण घेत असून त्या सिद्धांत रायफल क्लबच्या सक्रिय सदस्या आहेत.

त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सचिव व प्रशिक्षक राष्ट्रीय प्रख्यात नेमबाज किशन खारके, तसेच नगरसेवक सौरभजी मलुष्टे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. दोघींच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

संबंधित लेख