शाळेने मला कधीच नापास केलं नाही: नगरसेवक विकी नरळकर
- by Yogesh Bandagale
- December 31, 2025
- 344 views
चिपळूण : शहरातील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सध्या उत्साहात सुरू आहे. स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी चिपळूण नगर परिषदेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित पाग विभागाचे नगरसेवक मिथिलेश ऊर्फ विकी नरळकर यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी, संघर्ष आणि यशाचा प्रवास अत्यंत भावनिक शब्दांत उलगडून सांगितला.
या वेळी बोलताना विकी नरळकर म्हणाले, “मी शाळेत असताना खूप क्रिकेट खेळलो, खूप मजा केली, पण अभ्यासही तितकाच केला. आज याच शाळेत नगरसेवक म्हणून माझा सत्कार होतो आहे. माझे शिक्षक विभाकर वाचासिद्ध आज मुख्याध्यापक म्हणून स्वतः सत्काराचे निमंत्रण घेऊन येतात, ही लोकशाहीची खरी ताकद आहे.”
शाळेने आयुष्यात वेळेचे महत्त्व पटवून दिले, असे सांगताना त्यांनी एक हृद्य आठवण सांगितली. “मी शाळेत सकाळी उशिरा येत असे आणि सातत्याने आई आजारी असल्याचे कारण सांगत असे. एकदा मात्र आई खरोखरच आजारी पडली आणि अनेक दिवस आजारी होती. त्या घटनेनंतर मी ठरवलं, आयुष्यात कधीही खोटं बोलायचं नाही,” असे त्यांनी सांगितले.
पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण युनायटेड इंग्लिश स्कूलमध्येच झाल्याचे सांगत त्यांनी शाळेचे ऋण मान्य केले. “युनायटेड इंग्लिश स्कूलचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. या शाळेने मला घडवले,” असे ते म्हणाले.
आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, “लग्नाच्या वेळी इतर कुठेही विवाह न करता मी याच गुरुदक्षिणा सभागृहात लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज १६ वर्षे माझा संसार सुखाने सुरू आहे आणि मला दोन मुलं आहेत.”
नगर पालिका निवडणुकीतील अनुभव सांगताना त्यांनी एक वेगळाच किस्सा मांडला. “नगर पालिका निवडणुकीत मला उमेदवारी मिळाली. मतदानानंतर निकाल तब्बल २० दिवस पुढे ढकलण्यात आला. गुरुदक्षिणा सभागृहातच ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. अनेकजण मला विचारत होते, पण मी शांत होतो. मी सांगत होतो, मला कसलीच चिंता नाही. मी शाळेत क्रिकेटही खेळलो, मजाही केली, पण अभ्यासही केला. शाळेने मला कधीही नापास केलं नाही. त्यामुळे युनायटेड हायस्कूलमध्ये ईव्हीएम मशीन असल्यामुळे मी नक्कीच ‘नापास’ होणार नाही, निकाल माझ्याच बाजूने लागेल याची मला पूर्ण खात्री होती आणि तसेच घडले,” असे त्यांनी हसत सांगितले.
या कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित नगरसेवक व संस्थेच्या अलोरे हायस्कुलचे माजी विद्यार्थी उदय जुवळे, संजय गोताड, कांचन शिंदे, शाळा समितीचे चेअरमन विजय चक्रदेव, संचालक अभय चितळे, मुख्याध्यापक प्रभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षिका रेवती कारदगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी शाळेचा गौरव करताना सांगितले की, “युनायटेड इंग्लिश स्कूलने आजवर अनेक लोकप्रतिनिधी घडवले आहेत. सध्याच्या चिपळूण नगर पालिकेत एकूण २८ नगरसेवक असून त्यापैकी १३ नगरसेवक हे याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. नगराध्यक्ष उमेश सकपाळ हे देखील युनायटेड इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी असून आता विरोधी पक्षनेते म्हणून विकी नरळकर हे सुद्धा माजी विद्यार्थी असतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात श्रीफळ वाढवून करण्यात आली. विजय चक्रदेव आणि अभय चितळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणदर्शन कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन अधिक रंगतदार झाले.
