इटलीत बंदी असलेली ‘मिटेनी’ कंपनी रत्नागिरीत?
- by Yogesh Bandagale
- December 27, 2025
- 96 views
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
रत्नागिरी | प्रतिनिधी : इटलीमध्ये न्यायालयीन कारवाईनंतर बंद करण्यात आलेली आणि पर्यावरण व मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरलेली ‘मिटेनी एस.पी.ए.’ ही रासायनिक कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत सुरू होणार असल्याची माहिती समोर येताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत निवेदन सादर केले आहे.
इटलीमध्ये ‘फॉरेव्हर केमिकल्स’ (PFAS) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत विषारी रसायनांच्या उत्पादनामुळे मिटेनी कंपनीवर गंभीर आरोप सिद्ध झाले होते. या रसायनांमुळे सुमारे साडेतीन लाख नागरिकांचे पिण्याचे पाणी दूषित झाल्याचे तसेच कर्करोग, हार्मोनल विकार, वंध्यत्व यांसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले होते. यानंतर इटली सरकारने संबंधित कंपनीवर बंदी घालत दंडात्मक कारवाई केली होती.
अशा पार्श्वभूमीवर, या कंपनीची यंत्रसामग्री भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या ‘विवा लाईफ सायन्सेस’ या उपकंपनीने खरेदी करून रत्नागिरी जिल्ह्यात वापरात आणल्याचा दावा व्हिडीओ आणि वृत्तपत्रीय बातम्यांमधून समोर आला आहे. इटलीत बंदी असलेली कंपनी कोकणासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील, निसर्गसंपन्न व शेतीप्रधान भागात कशी येऊ शकते, असा गंभीर सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. विश्वजीत गाताडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. निवेदनात कोकणच्या निसर्गावर, शेतीवर, जलस्रोतांवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही रासायनिक प्रकल्पाला जिल्ह्यात परवानगी देऊ नये, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.
शिवसेनेने मागणी केली आहे की, मिटेनी कंपनी किंवा तिच्याशी संबंधित कोणताही प्रकल्प लोटे परशुराम येथे प्रस्तावित आहे का, याची तातडीने चौकशी करून अधिकृत माहिती जनतेसमोर मांडावी. तसेच अशा प्रकारच्या घातक उद्योगांवर प्रशासकीय पातळीवर पूर्णतः बंदी घालावी. अन्यथा जनहितासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ही कारवाई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. दत्तात्रय (दत्ताजी) कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी चिपळूण तालुकाप्रमुख श्री. बळीराम गुजर, उपतालुकाप्रमुख श्री. विजय देसाई यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला नेत्या आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणच्या पर्यावरणाला आणि जनजीवनाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही उद्योगाविरोधात शिवसेना ठामपणे लढा देईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
