व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्षांचा थेट संवाद
- by Yogesh Bandagale
- January 13, 2026
- 119 views
चिपळूण : निवडणुकीपूर्वी व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जातात; मात्र निवडून आल्यानंतर पदग्रहण केल्यानंतर तात्काळ व्यापाऱ्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेण्यासाठी बैठक आयोजित करणारे नगराध्यक्ष आम्ही प्रथमच पाहत आहोत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ व्यापारी व यशस्वी व्यावसायिक अरुणशेठ भोजने यांनी काढले. शहरातील पाग येथील श्रीकृष्ण सभागृहात चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न, समस्या व सूचना सविस्तरपणे ऐकून घेतल्या. त्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काय करता येईल, यावर सखोल विचारविनिमय झाला. बैठकीला शंभरहून अधिक व्यापारी उपस्थित होते. बहादूरशेख नाक्याच्या पुढे एकही बाहेरचा व्यापारी यापुढे दिसता कामा नये, असे आदेश सकपाळ यांनी प्रशासनाला दिले.
या वेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ म्हणाले, “व्यापारी जगला तरच शहर जगेल, व्यापार वाढला तर शहर वाढेल. व्यापारी मोठा झाला पाहिजे. मी व्यापाऱ्यांच्या सोबत आहे आणि त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे.”
स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. आजपासून स्थानिक व्यापाऱ्यांना वगळून बाहेरील व्यापाऱ्यांनी चिपळूण शहरात अनधिकृतपणे व्यवसाय करू नये, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली.
या बैठकीला नगरसेवक कपिल शिर्के, उदय जुवळे, गणेश आग्रे, राणी महाडिक, हर्षाली पवार, शिवसेनेचे गटनेते अंकुश आवले, निहार कोवळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्यासह नगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान व्यापारी संघटना व चिपळूण व्यापारी महासंघाच्या वतीने नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
अतुल पेठकर यांनी पानगल्ली परिसरात गटार तुंबून रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दा मांडला. शमशुद्दीन सनगे यांनी बाजारपेठेत बेकायदेशीर गाड्या लागणे व बाहेरील व्यापाऱ्यांकडून कांदा, बटाटा, लसूण, फळे विक्री केली जात असल्याकडे लक्ष वेधले.
संदीप लवेकर यांनी बाहेरील व्यापाऱ्यांना एका ठिकाणी जागा द्यावी, फळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ, ग्राहकांसाठी स्वच्छतागृहे व वाहनतळ उपलब्ध करावेत, अशी मागणी केली.
व्यापारी महासंघाचे सचिव उदय ओतारी यांनी संघाच्या वतीने सविस्तर निवेदन वाचन केले. सर्व गटारे आठवड्यातून एकदा स्वच्छ करावीत, सुलभ शौचालयांची आवश्यकता, चिकन-मटण विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा असावी, अशी मागणी करण्यात आली.
बापू काणे यांनी शहरातील जुने टेलिफोन पोल हटवणे, वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारणे व खाटीक आळी ते सनगे घर रस्त्याबाबत उपाययोजना करण्याची सूचना केली.
ज्येष्ठ व्यापारी शिरीष काटकर यांनी बाहेरील व्यापाऱ्यांबाबत कडक भूमिका घेण्याची गरज व्यक्त करत महावितरण व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली.
रामशेठ रेडीज यांनी सांडपाणी थेट नदीत जाण्याचा मुद्दा उपस्थित करत वृक्षलागवडीचा आढावा घेण्याची मागणी केली. अरुणशेठ भोजने यांनी महावितरण पालिकेच्या जागेत पोल उभारून महसूल मिळवत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यावर शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली.
नगराध्यक्षांचा थेट संवाद
यानंतर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी तब्बल पन्नास मिनिटे व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला. “व्यापार वाढला तर शहर वाढेल. शहर स्वच्छ व सुव्यवस्थित दिसावे, यासाठी माझे विशेष लक्ष राहील,” असे त्यांनी सांगितले.
चिंचनाका ते पावर हाऊस तसेच बहादूरशेख नाका ते भेंडीनाका या रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यास व्यापाराला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. बाजारपेठेतील समस्या प्रत्यक्ष पाहण्यासाठी व्यापाऱ्यांच्या दहा-दहा जणांच्या टीमसोबत ठराविक वेळेत फेरी मारण्याचा प्रस्तावही त्यांनी दिला.
वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम, खाऊ गल्लीचे व्ही गॅलरीत स्थलांतर, रेड लाईन–ब्ल्यू लाईन संदर्भातील प्रश्न, भूमिगत वीजवाहिन्या, पोलीस व महावितरण यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “मी एकटा बदल घडवू शकत नाही; व्यापारी, शिक्षक, सामाजिक संस्था सर्वांना सोबत घेऊनच शहराचा विकास करायचा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या शेवटी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. या बैठकीला नगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
