विरोधी उमेदवार शैलेश टाकळे यांना मिठी मारत निहार कोवळे यांचा नवा आदर्श
- by Yogesh Bandagale
- December 27, 2025
- 1227 views
चिपळूण (योगेश बांडागळे): निवडणूक हा केवळ विजयाचा क्षण नसून जनतेने दिलेली मोठी जबाबदारी आहे. हा विश्वास कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी भावना नवनिर्वाचित नगरसेवक निहार कोवळे यांनी व्यक्त केली. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पराभूत उमेदवार श्री. शैलेश टाकळे (शैलू दादा) यांच्या कार्याचेही मनापासून कौतुक केले.
निहार कोवळे म्हणाले की, शैलेश टाकळे यांनीही विजयासाठी तितक्याच प्रामाणिकपणे प्रयत्न केले. जनतेपर्यंत पोहोचण्याचा आणि लोकांचे प्रश्न मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न मी जवळून पाहिला आहे. निवडणूक जिंकणे-हरणे क्षणिक असते; मात्र समाजासाठी काम करण्याची भावना ही हृदयातून येते. विचार वेगळे असू शकतात, मार्ग वेगळे असू शकतात, पण उद्दिष्ट एकच असते, प्रभागाचा विकास आणि नागरिकांचे सुखद भविष्य.
निवडणूक संपल्यानंतर मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येत हातात हात घालून प्रभाग क्रमांक ५ च्या विकासासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. “हा विजय माझा एकट्याचा नसून प्रभाग क्रमांक ५ मधील प्रत्येक नागरिकाचा आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या वेळी निहार कोवळे यांनी नमूद केले की, निवडणुकीदरम्यान शैलेश टाकळे यांनी कधीही वैयक्तिक टीका केली नाही. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या काही मोजक्या व्यक्तींनी केलेल्या वैयक्तिक टीकेबाबत “त्यांना देण्यात येणारी शिक्षा म्हणजे मी त्यांना मनापासून माफ करणे,” अशी भूमिका त्यांनी घेतली.
शैलेश टाकळे हे नेहमीच आपल्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व राहिले असल्याचे सांगत, त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन भविष्यातही महत्त्वाचे राहील, असेही निहार कोवळे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक निकालानंतर निहार कोवळे आणि शैलेश टाकळे यांनी एकमेकांना मिठी मारत “निवडणूक संपली, राजकारण संपले” असा संदेश दिला. या सौहार्दपूर्ण क्षणातून त्यांनी वेगळी आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा चिपळूणसमोर मांडली, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी शैलेंद्र सावंत, वैभव रेडीज व अन्य उपस्थित होते.
