श्री देवी करंजेश्र्वरीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय प्रारंभ
- by Yogesh Bandagale
- September 23, 2025
- 126 views
चिपळूण : कोकणच्या निसर्गरम्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत, भगवान परशुरामाच्या पुण्यभूमीत आणि वाशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेल्या गोवळकोट येथे किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिशक्ती श्री देवी करंजेश्र्वरीच्या नवरात्रोत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा सोमवार, दि. २२ सप्टेंबरपासून ते अश्विन शुद्ध सप्तमी रविवार, दि. २८ सप्टेंबरपर्यंत हा सोहळा उत्साहात साजरा होत असून यानिमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे आणि दर्शनासाठी असंख्य भाविकांची गर्दी होत आहे.
श्री देवी करंजेश्र्वरी हे प्राचीन देवस्थान असून पटवर्धन घराण्याची ही कुलस्वामिनी मानली जाते. रियासतकारांच्या मते ८ व्या शतकापासून ही परंपरा सुरू आहे. करंजीच्या झुडपात देवी प्रकट झाल्याची आख्यायिका असून त्यातूनच देवीला करंजेश्र्वरी हे नाव प्राप्त झाले. या झुडपाच्या ठिकाणी ‘शिंगासन’ नावाची पवित्र जागा असून देवी प्रकट झाल्याची कथा भाविकांमध्ये आजही श्रद्धेने सांगितली जाते. श्री शिवप्रभूंनी देखील याच स्थानी देवीचे भवानीमातेच्या रूपात दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळतो.
नवरात्रोत्सव काळात देवस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने सात दिवसांचा नामसप्ताह आयोजित केला जातो. घटस्थापनेच्या दिवशी प्रमुख मानकऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजन करून विणा पूजनाने नामसप्ताहास सुरुवात झाली. या काळात दररोज दुपारी मध्यान्ह आरती, सायंकाळी हरिपाठ आणि दिंडीमुळे मंदिर परिसर भक्तिमय होतो. या हरिपाठात दोनशेहून अधिक वारकरी सहभागी होत असतात. खास आकर्षण म्हणजे गावातील सात वाड्यांची बारी म्हणून होणारी भजनपरंपरा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण भक्तिभावाने गात-नाचत या भजनांत सहभागी होतात. त्यामुळे गावात दांडियाची पद्धत नसून सर्वजण देवीच्या भजनांत रममाण होतात.
रात्री भजनांनंतर प्रहरकरी मंडळाच्या वतीने नाटक, नमन, गाण्यांचे कार्यक्रम आयोजित होतात आणि भाविकांना चहा व शिरा याचा विशेष प्रसाद दिला जातो. नवरात्रोत्सव काळात एस.टी. महामंडळ विशेष बससेवेची सोय करून देते. संपूर्ण उत्सवाचे उत्तम नियोजन श्री सोमेश्वर व श्री देवी करंजेश्र्वरी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले असून या काळात असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
