विज्ञानातून कौशल्य आत्मसात करा – सौ. पूजाताई निकम
- by Yogesh Bandagale
- March 06, 2026
- 84 views
सावर्डे : राष्ट्रीय विज्ञान दिन आणि चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री आयटीआय सावर्डे येथे तांत्रिक मॉडेल प्रदर्शन २०२६ चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजाताई शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य संजय राजाराम कदम, चिपळूण पंचायत समिती सदस्य शौकत हुसेन माखजनकर, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडीक, व्यवस्थापन समिती सदस्य अब्दुल रज्जाक इसाक शेख, राधा गोविंद फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम, बी.एससी. आयटी कॉलेज सावर्डेचे प्राचार्य एकनाथ गावडे, आयटीआय सावर्डेचे प्राचार्य उमेश लकेश्री, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व फीत कापून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध तांत्रिक मॉडेल्सची मान्यवरांनी पाहणी केली. मॉडेल तयार करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांकडून त्यांनी माहितीही जाणून घेतली.
जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन २०२६ मध्ये आयटीआय सावर्डेच्या मेकॅनिक मोटार व्हेईकल प्रकल्पाला आठवा क्रमांक मिळाल्याबद्दल प्रशिक्षणार्थी सोहम कुंभार आणि आयुष निवळकर तसेच मार्गदर्शक प्रशांत भिसे आणि प्रथमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आर.ए.सी. विभागाचे निर्देशक सुरेंद्र हातखंबकर यांना शिवबा प्रतिष्ठान, राजापूर आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले.
कार्यक्रमात आयटीआयमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांवरील प्रकल्पांचे रिल्स आणि सादरीकरणही दाखवण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ. पूजाताई निकम म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून विविध कौशल्ये आत्मसात करावीत. आयटीआयमध्ये शिकविल्या जाणाऱ्या तांत्रिक कोर्सेसमधून मिळणारे ज्ञान आणि कौशल्य आपल्या आयुष्यात उपयोगात आणा. पुढे जाऊन आपल्या गावाचे चांगले नागरिक बना आणि आपल्या कर्तृत्वाने सह्याद्री शिक्षण संस्थेचे नाव उंचवा.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिटर निर्देशक सुभाष गोरिवले यांनी केले, तर प्राचार्य उमेश लकेश्री यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.
