बेदरकारपणे डंपर चालवून अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे टाटा डंपर चालवत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवार, २० डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता जयगड–निवळी मार्गावरील चाफे धनगरवाडा येथे घडला. दिनेशकुमार खेद यादव (वय ४५, रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. या प्रकरणी टाटा टिपरचा क्लिनर आशुतोष संतोषकुमार यादव (वय २२, रा. पनवेल, जि. रायगड) याने जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, चालक दिनेशकुमार यादव हा आपल्या ताब्यातील टाटा टिपर (क्र. एमएच-४६-डीसी-८०१०) घेऊन जयगडहून निवळीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. चाफे धनगरवाडा येथील पुष्प काजू बागेसमोर आल्यावर त्याचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या साईडपट्टीवरून घसरत पलटी झाली.

या अपघातात वाहनातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून डंपरचेही नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित लेख