लोटेतील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ एमपीसीबीच्या रडारवर

सोशल मीडियावरील गदारोळानंतर मुंबईहून चौकशी पथक दाखल; परवाने व उत्पादन प्रक्रियेची तपासणी सुरू

लोटे | प्रतिनिधी

लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज कंपनीने इटलीत बंदी असलेल्या रासायनिक कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व पेटंट्स वापरात आणल्याच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भातील पोस्ट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) सतर्क झाले असून, मुंबई येथील मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी पथक सोमवारी लोटेत दाखल झाले आहे.

इटलीमध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषण प्रकरणामुळे बंद पडलेल्या आणि न्यायालयीन कारवाईला सामोरे गेलेल्या ‘मिटेनी एस.पी.ए.’ या रासायनिक कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व पेटंट्स लक्ष्मी ऑरगॅनिक्सच्या एका उपकंपनीने खरेदी करून लोटे येथे वापरात आणल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या प्रकरणाची दखल घेतल्याने स्थानिक पातळीवर चिंता अधिक वाढली आहे.

लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत पीएफएएससारख्या रसायनांचे उत्पादन झाल्यास वाशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी तसेच मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला कडक अटींसह परवानगी दिल्याचा दावा केला असला, तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने त्या अटींच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस

सध्या संबंधित कंपनीत नियमित उत्पादन सुरू नसून केवळ चाचणी बॅचेस घेण्यात आल्याची माहिती आहे. या चाचण्यांमधून निर्माण झालेला टाकाऊ कचरा तळोजा येथे सुरक्षितरीत्या विल्हेवाटीसाठी पाठवण्यात आला आहे. ४ नोव्हेंबर रोजी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट देऊन चाचण्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली होती. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो तज्ज्ञ समितीकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

चौकशी पथकाची कारवाई

सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असलेल्या माहितीनंतर एमपीसीबीने तातडीची पावले उचलत मुंबईहून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी पथक लोटेत पाठवले आहे. कंपनीतील यंत्रसामग्री, वापरलेले तंत्रज्ञान, पेटंट्स तसेच दिलेले परवाने यांची सखोल तपासणी सुरू असून, नेमकी वस्तुस्थिती काय आहे याची शहानिशा केली जात आहे.

संबंधित लेख