देवरुखवासीय समस्यांच्या गर्तेत

 

देवरूख (सुरेश सप्रे): देवरूख शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेत नाही. चोरपऱ्या ते बसस्थानक या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांवर नगर परिषदेने गणेशोत्सवापूर्वी थातूरमातूर मलमपट्टी केली होती. मात्र काही दिवसांतच ती उखडून गेल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला असून, सर्वसामान्य नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिक प्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे “नागरिकांचा वालीच नाही” अशी भावना जनतेत व्यक्त होत आहे. त्यातच बेशिस्त पार्किंग, हातगाड्यांची गर्दी, भटकी कुत्री आणि मोकाट जनावरे यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, पण प्रवाशांचा प्रवास मृत्युच्या दाराशी पोचतोय, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

मागील वर्षी नगर पंचायतीने लाखो रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांची कामे केली होती. मात्र त्याच पावसाळ्यात रस्ते खड्डेमय झाले. त्यावर झालेली दुरुस्ती पुन्हा पावसात वाहून गेली. त्यामुळे नागरिकांच्या पाठीशी खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ कायम राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर देवरूखातील खड्ड्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच ऊत आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी नपमध्ये घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. परंतु “सत्ताकाळात झालेली कामे पारदर्शकतेने झाली होती का?” असा सवाल जनतेतून पुढे येतो आहे.

दरम्यान तहसिल कार्यालय ते मातृमंदिर, चोरपऱ्या ते पंचायत समिती, एसटी बसस्थानक, नगर पंचायत ते मशिद, बसस्थानक ते भूमी आलेख कार्यालय अशा अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यांवरून वाहन चालवणे म्हणजे अक्षरशः कसरतीचा खेळ ठरत असून, अपघाताची शक्यता कायम आहे.

 खड्डे, मोकाट जनावरे आणि वाहतूक कोंडीमुळे दवरूखकरांचा रोजचा प्रवास मृत्यूशी खेळण्यासारखा झाला आहे, अशी तीव्र नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.

संबंधित लेख