स्व. गोविंदरावजी निकम जयंती महोत्सव १६–१७ जानेवारीला

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त दि. १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी सावर्डे येथील स्मृतिगंध या स्मारकस्थळी भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार असून, यावेळी दीपस्तंभ फाउंडेशन (जळगाव) चे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय वक्ते यजुर्वेद महाजन तसेच मराठी चित्रपट, नाट्य व दूरदर्शन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शिका गार्गी फुले थत्ते यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत युवा पिढीला मार्गदर्शन मिळणार आहे.

दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक असलेले यजुर्वेद महाजन हे शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते व प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जातात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवणे, स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणे तसेच ‘अभ्यास मित्र – करिअर मित्र – पालक मित्र’ या संकल्पनेतून मार्गदर्शन करणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.

तर अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या गार्गी फुले थत्ते यांच्या विचारांची प्रेरणादायी मेजवानी यानिमित्ताने युवकांना लाभणार आहे.

जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे :
दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता भक्तीसंगम सह्याद्री कलामंच प्रस्तुत ‘गीतांजली’ कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता ‘फक्त बसा आणि मनसोक्त हसा’ हा विशेष विनोदी कार्यक्रम लोकशाहीर रणजित आशा अंबाजी (कोल्हापूर) सादर करणार आहेत. सायंकाळी ७ वाजता सह्याद्री परिवार व कर्मचारीवृंद यांच्यावतीने भजन संध्या सादर केली जाणार आहे.

शनिवार, दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ होणार असून, या कार्यक्रमाला मराठी अभिनेते व हास्य जत्रा फेम प्रभाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याच दिवशी सकाळी ११ वाजता सह्याद्री बालकलाविष्कार तर दुपारी २ वाजता सह्याद्री युवा कलाविष्कार सादर केला जाणार आहे.

या सोहळ्याला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, विश्वस्त मंडळातील सर्व सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या जयंती महोत्सवात स्व. गोविंदरावजी निकम साहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रहिताच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असून, विविध उपक्रम व मार्गदर्शन सत्रांद्वारे त्यांचा विचारवारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.

या ९१ व्या जयंती महोत्सवात नागरिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सचिव महेशजी महाडिक व महोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख