प्रभाग ११ मध्ये 'आप'चे सचिन आपिष्टे प्रचारात आघाडीवर
- by Yogesh Bandagale
- November 30, 2025
- 67 views
देवरूख ( सुरेश सप्रे) : देवरूख नगर पंचायत निवडणुकीची रणधूमाळी चांगलीच तापली असून सर्वच प्रभागांत प्रचाराचा जोर वाढत आहे. मात्र प्रभाग क्रमांक ११ मध्ये 'आप'चे उमेदवार सचिन आपिष्टे यांनी घराघरांत प्रत्यक्ष भेटीद्वारे केलेल्या प्रभावी जनसंपर्कामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 'आप'च्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे, नेहमीच लोकांमध्ये राहून काम करणारे नेतृत्व म्हणून सचिन आपिष्टे यांनी गेल्या काही वर्षांत भक्कम ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या सक्रिय कामशैलीमुळे प्रभागातील नागरिक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. निवडणूक असो वा नसो, कोणत्याही नागरिकाच्या हाकेला धावून जाणारे, सुख–दुःखात सहभागी होणारे आणि राजकारणासह सामाजिक उपक्रमांतही आघाडी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
याच सततच्या जनसंपर्क आणि तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या स्वभावामुळे प्रभागातील मतदारांचा कल आपिष्टे यांच्या बाजूकडे झुकत असल्याचे दिसून येत आहे. प्रभाग ११ मधील मतदारांशी संवाद साधताना, “विकासाची दृष्टी असलेले आणि जमिनीवर काम करणारे सचिन आपिष्टे हेच नगरसेवकपदी योग्य,” असे मतदार स्पष्टपणे व्यक्त करत आहेत.
या प्रभागातून आप-गाव विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दिक्षा खंडागळे यांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सचिन आपिष्टे आणि दिक्षा खंडागळे यांच्या जोडीला मतदार देत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आगामी ३ तारखेचा निकाल हा प्रभाग ११ मध्ये ‘आप’च्या बाजूने लागेल, असा विश्वास पक्षाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
