मुंबई विद्यापीठाच्या संघात रत्नागिरीचा सायकलपटू अथर्व भोसले
- by Yogesh Bandagale
- February 10, 2026
- 82 views
चिपळूण प्रतिनिधी :कु. अथर्व हेमंत भोसले याने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. या निवड चाचणीत अथर्वने चौथा क्रमांक पटकावत ऑल इंडिया युनिव्हर्सिटी सायकलिंग स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातून निवड होणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.
या स्पर्धेतून पहिल्या सहा खेळाडूंना ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी संधी देण्यात आली असून, अथर्वची निवड ही त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीची आणि गुणवत्तेची पावती आहे.
चिपळूण सायकलिंग क्लब हा केवळ दैनंदिन सायकलिंगपुरता मर्यादित न राहता रेसिंग, आयर्नमॅनसारख्या स्पर्धात्मक सायकलिंग प्रकारांमध्ये खेळाडू घडवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. क्लबच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले असून विविध स्पर्धांमध्ये पोडियम स्थान पटकावले आहे.
चिपळूण सायकलिंग क्लब व रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राज्य व देशपातळीवर उज्वल व्हावे, या उद्देशाने क्लब सातत्याने कार्यरत आहे. कु. अथर्व हेमंत भोसले हा क्लबच्या पुढील पिढीचा प्रेरणादायी चेहरा ठरत असून, त्याचे हे यश नवोदित खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देणारे आहे.
आगामी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी अथर्व सध्या चिपळूण सायकलिंग क्लबच्या अनुभवी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करत असून, त्याच्या पुढील वाटचालीस चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
