आर.सी. काळे माध्यमिक विद्यालयात दीपोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

चिपळूण: भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित आर.सी. काळे माध्यमिक विद्यालयात दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेचा सुंदर आविष्कार घडवला.

सौ. गुरसळे  यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आकर्षक भेटकार्ड, सुंदर आकाशकंदिल आणि पणत्या तयार केल्या. या हस्तकलेच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील कलात्मक कौशल्य आणि सर्जनशीलता खुलून आली.

या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी केली होती. पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी आकाशकंदिल बनवले, तर शाळेच्या दर्शनी भागात त्यांनी तयार केलेली भेटकार्डे लावण्यात आली होती. सातवीच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी आणि पणत्यांची सुंदर आरास करून परिसर आकर्षक केला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. माळी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत त्यांच्या कलेचे कौतुक केले. तसेच पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांनी कागदी पिशव्या बनवून पर्यावरण जनजागृतीचे काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

शाळेच्या पर्यावरण विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. माळी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त व पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

संपूर्ण शाळा आनंदी, उत्साही आणि मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. विद्यार्थ्यांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद लुटला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सर्जनशील दिवाळी साजरी करण्याची जाणीव निर्माण झाली.

संबंधित लेख