मिरजोळे एमआयडीसीतील मत्स्य प्रक्रिया कंपनीची १.५८ कोटींची फसवणूक
- by Yogesh Bandagale
- February 16, 2026
- 71 views
रत्नागिरी, दि. १६ : रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मिरजोळे एमआयडीसीतील एका नामांकित मत्स्य प्रक्रिया कंपनीची तब्बल १ कोटी ५८ लाख ७५ हजार २४० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१६ (२) व ३१८ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हैदरअली शब्बीर सनदी (वय ३५), अकाउंट मॅनेजर, जिलानी मरीन प्रोडक्ट्स, एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०.४६ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी श्रीधरन किशोर कुमार, संचालक, Kishore Kumar & Company (Exports) Pvt. Ltd., जी.एच.एस. रोड, मंगळुरू (कर्नाटक) यांनी ६ जानेवारी २०२५ ते १३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकूण २४ टन मत्स्य उत्पादन मालाची मागणी केली होती. हा माल इटली येथील Ardimar S.R.L. कंपनीसाठी असल्याचे सांगून त्यांनी जिलानी मरीन प्रोडक्ट्सचा विश्वास संपादन केला.
आरोपीने मालाची संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली जाईल, असे आश्वासन देत व्यवहार पूर्ण केला. त्यानुसार कंपनीकडून २४ टन मत्स्य उत्पादन परदेशात पाठविण्यात आले. मात्र माल पाठवूनही संबंधित रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. यामुळे कंपनीला एकूण १,५८,७५,२४० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने अर्दिमार एस.आर.एल. (इटली) या कंपनीच्या नावाखाली दिशाभूल करून व्यवहार केला व जाणूनबुजून रक्कम अदा न करता कंपनीचा विश्वासघात केला.
या प्रकरणी पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.
