महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘मधुभाई – साहित्य, समाज कृतज्ञता सोहळा’
- by Yogesh Bandagale
- February 14, 2026
- 32 views
अनुवाद अकादमीमार्फत मराठी साहित्य इतर भाषांत; परदेशातील मराठी मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण – डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. १४ (जिमाका) : मराठी साहित्याचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा, यासाठी अनुवाद अकादमी स्थापन करून मराठीतील साहित्य हिंदी, कन्नड, तमिळ आदी भाषांमध्ये अनुवादित करण्यास शासनाकडून निधी दिला जाणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. तसेच परदेशातील मराठी मुलांसाठी ऑनलाईन मराठी शिक्षणाचा उपक्रम पुढील वर्षापासून सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मधुभाई – साहित्य, समाज कृतज्ञता सोहळा’ निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक (पद्मश्री) यांचा भव्य नागरी सत्कार आणि प्रकट मुलाखत कार्यक्रम रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सामंत यांच्या हस्ते पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले की, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना मराठी साहित्य इतर भाषांत प्रकाशित व्हावे, असा संकल्प केला होता. त्या संकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलनात अनुवाद अकादमी स्थापनेचा निर्णय घेतला जाणार आहे.
मराठी भाषा विभागाला वित्त मंत्री अजित पवार यांनी २६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत, त्या माध्यमातून राज्यभर विविध साहित्य संमेलनांचे आयोजन सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन तसेच दिल्ली व सातारा येथील मराठी साहित्य संमेलने यांचा उल्लेख त्यांनी केला.
डॉ. सामंत यांनी पुढे सांगितले की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी अध्यासन केंद्र स्थापन करण्यात आले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर एम.ए. अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये ‘मराठी पुस्तकांचे गाव’ उभारण्याचाही निर्णय मराठी भाषा विभागाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरीतील दामले विद्यालयाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या शाळेचा आदर्श इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घ्यावा. पहिली ते दहावीपर्यंत सुमारे १५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून, पहिल्या वर्गासाठी शंभर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी असते, असे त्यांनी नमूद केले.
मराठी साहित्याची खरी किंमत तंजावर, बेळगाव, दिल्ली किंवा परदेशात गेल्यावर अधिक जाणवते, असे सांगत त्यांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परराज्यातील व परदेशातील लोकांनाही मराठी शिकवण्याचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या साहित्य प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि जयु भाटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले. कार्यक्रमास कोकण विभागातील साहित्यिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
