परशुराम एज्युकेशन सोसायटीचा १०७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 115 views
चिपळूण: कोकणातील अग्रगण्य आणि शिक्षणपरंपरेने समृद्ध असलेल्या परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण या प्रतिष्ठित संस्थेचा १०७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाने ओतप्रोत भरलेला हा सोहळा शिक्षणविश्वासाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानप्रबोधिनी, पुणेचे प्राचार्य श्री. मिलिंद नाईक आणि पर्यवेक्षिका सौ. रागिणीताई नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम पूजन, दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. पोफळी शाळेच्या सौ. धुमाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाला भक्तिरसपूर्ण सुरुवात झाली.
यानंतर पोफळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या समृद्ध वाटचालीचा गौरवशाली इतिहास ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून सादर करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय श्री. महेंद्र कापडी आणि सौ. स्वप्नाली पाटील यांनी करून दिला.
संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. मकरंद जोशी यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात गुरुतुल्य कै. गोवंडे सर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा “आदर्श शिक्षक पुरस्कार” यंदा अलोरे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री. चंद्रकांत राठोड यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये शाल, सन्मानपत्र आणि रोख रक्कम यांचा समावेश होता. आपल्या मनोगतात राठोड सरांनी शिक्षक म्हणून केलेल्या कामाचा आणि अनुभवांचा हृदयस्पर्शी आढावा घेतला.
मुख्य अतिथी श्री. मिलिंद नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. “शिक्षकांनी सतत शिकत राहिले पाहिजे, देशभरातील चांगल्या शैक्षणिक संकल्पना आत्मसात केल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. पुस्तक हे सर्वस्व नाही – ते फक्त माध्यम आहे; अनुभवाधिष्ठित शिक्षणच खरी प्रगती घडवते,” असे ते म्हणाले.
संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. मकरंद जोशी यांनी संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर संस्थेमार्फत शिक्षकांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. “पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित करणारे कार्यक्रम ही काळाची गरज असून, संस्थेचे प्रयत्न त्या दिशेने सुरू राहतील,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात पोफळी हायस्कूलचे कलाशिक्षक श्री. प्रथमेश विचारे यांनी भगवान परशुरामांची आकर्षक रांगोळी साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रदीपकुमार यादव यांनी समर्थपणे केले, तर खडपोली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वीणा चव्हाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता श्री. विलास मायनाक यांनी गायलेल्या ‘पसायदान’ या सुरेल प्रार्थनेने झाली.
१०७ वर्षांची अखंड शिक्षणयात्रा पूर्ण करत असताना परशुराम एज्युकेशन सोसायटीने पुन्हा एकदा शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेतील आपली ओळख दृढ केली — असा भावपूर्ण संदेश या उत्सवातून देण्यात आला.
