प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर

५ व ७ जानेवारीला चिपळूणमध्ये समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

चिपळूण : वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन व सामाजिक जाणिवेचे नेतृत्व मानले जाणारे श्री. प्रशांत यादव यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त दि. ५ व ७ जानेवारी २०२६ रोजी समाजोपयोगी आणि मानवी संवेदनांना स्पर्श करणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर, तर ७ जानेवारी रोजी मोफत भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

वाशिष्ठी कृषी महोत्सव आणि प्रशांत यादव यांचा वाढदिवस या अनोख्या संगमातून आरोग्यजागरूकता व सामाजिक बांधिलकी या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून हे उपक्रम राबवले जात असून, सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ मिळावा हा यामागील मुख्य उद्देश आहे.

सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० नंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर चिपळूण नगरपरिषदेचे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदान, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे, कृषी महोत्सवाच्या ठिकाणी होणार आहे. जीवनदायी रक्तसाठा उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमाला विशेष महत्त्व असून, समाजातील प्रत्येक घटकाने या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत संजीवनी सर्जिकल व जनरल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर देखील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदान, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे होणार आहे.

या आरोग्य शिबिरात सामान्य शस्त्रक्रिया, मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स, पोटविकार, सर्व प्रकारच्या अंगावरील गाठी तसेच स्त्रीरोग व प्रसूतीविषयक आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. महिलांसाठी मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे आजार, वंध्यत्व, कुटुंब नियोजन, तसेच प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची तपासणी याबाबतही सखोल माहिती देण्यात येणार आहे.

या शिबिरात डॉ. अक्षय विजय यादव (एम.एस. जनरल सर्जरी – मूळव्याध व पोटविकार तज्ज्ञ) आणि डॉ. पूजा ओंकार भुरण (बी.ए.एम.एस., डी.जी.ओ. – स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ) नागरिकांची मोफत तपासणी करणार असून, गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रियांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी ९४२२६६११९७, ९४२११३४३३६ किंवा ९८९०३९३८२३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी देण्याचा हा आदर्श उपक्रम असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, या सेवाभावी उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव आणि डॉ. कु. स्वामिनी प्रशांत यादव यांनी केले आहे.

संबंधित लेख