राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृती

रत्नागिरी बसस्थानकात ग्राहक हक्कांबाबत माहितीपर प्रदर्शन

रत्नागिरी, दि. २४ (जिमाका) : राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी येथील मुख्य बसस्थानक परिसरात आज विशेष माहितीपर ग्राहक जनजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनास अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शशिकांत यादव, औषध निरीक्षक श्री. सोपान वाडे, अन्न सुरक्षा अधिकारी सौ. भाग्यश्री परदेशी, सौ. तृप्ती घरत, श्री. संकेत कोगेरी, श्री. ज्ञानेश्वर आटपाडकर आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये, अन्न व औषध खरेदी करताना घ्यावयाची काळजी, फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, तक्रार नोंदणीची प्रक्रिया आदी विषयांवर माहितीपर फलक लावण्यात आले होते. तसेच नागरिकांना पत्रकांचे वितरण करून मार्गदर्शन करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी नागरिकांना अन्न व औषधे खरेदी, साठवणूक, वापर व विल्हेवाट लावताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्यात आली. खाद्यपदार्थ व औषधांच्या गुणवत्तेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची खरेदी करू नये, औषधे खरेदी करताना रजिस्टर फार्मासिस्टच्या उपस्थितीत अधिकृत बिलासहच खरेदी करावी, असे स्पष्ट करण्यात आले.

या प्रदर्शनामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाली असून, अशा उपक्रमांमुळे ग्राहक संरक्षण अधिक प्रभावी होण्यास हातभार लागेल, असे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, तालुकास्तरावर दापोली येथे दापोली केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील श्री. सु. वि. पाटील व श्री. शुभम चव्हाण यांनी सहभाग घेतला.

या उपक्रमासाठी रत्नागिरी शहर बसस्थानकाचे व्यवस्थापक श्री. महेश सावंत तसेच लांजा तालुक्यातील ओजस मेडिकलचे श्री. लिमये यांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख