नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची अजित पवारांना श्रद्धांजली
- by Yogesh Bandagale
- January 29, 2026
- 180 views
चिपळूण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली असून, विविध क्षेत्रांतून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या नेतृत्वगुणांचा आणि माणुसकीच्या स्वभावाचा विशेष उल्लेख केला आहे.
उमेश सकपाळ यांनी सांगितले की, मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या विमान अपघाताची बातमी समजताच दादा सुखरूप असावेत, यासाठी त्यांनी कुटुंबासह प्रार्थना केली होती. मात्र, त्यानंतर आलेली बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक होती.
“अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण पोकळ वाटेल. त्यांचे व्यक्तिमत्त्व दिलखुलास, रोखठोक आणि कार्यकर्त्यांना आपलेसे वाटणारे होते,” अशा शब्दांत सकपाळ यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचेही त्यांनी म्हटले.
अजित पवारांची काम करण्याची शैली, प्रशासनावरची पकड आणि निर्णयक्षमता कायम स्मरणात राहील, असे सांगत त्यांनी बारामतीशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याचा उल्लेख केला. “ज्या बारामतीवर त्यांनी जीवापाड प्रेम केले, त्याच भूमीत त्यांचा अंत होणे हा वेदनादायक योगायोग आहे,” असेही ते म्हणाले.
वैयक्तिक आठवणी सांगताना सकपाळ म्हणाले की, विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. सुमारे तासभर त्यांनी आपुलकीने संवाद साधत कुटुंबाची विचारपूस केली होती. दुधाच्या व्यवसायातून झालेल्या प्रगतीबद्दल त्यांनी केलेले कौतुक आयुष्यभर विसरता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यालय स्वतःचे असल्याचे समजल्यावर “कष्टाचं चीज झालं” असे म्हणून प्रोत्साहन दिले, तसेच कार्यालयासमोर झाडे लावण्याचा सल्ला दिल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
अजित पवार वेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्याविषयी नेहमीच आदर असल्याचे सांगत, चिपळूण शहरावर त्यांचे विशेष प्रेम होते आणि शहराच्या विकासासाठी त्यांनी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही, असे सकपाळ यांनी स्पष्ट केले.
“चिपळूण शहराचा प्रथम नागरिक म्हणून आणि माझ्या कुटुंबीयांच्या वतीने, मी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असे सांगत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
