श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिरात कार्तिकी एकादशीला होणार भव्य सोहळा
- by Yogesh Bandagale
- October 30, 2025
- 73 views
चिपळूण : चिपळूण शहरातील खेंड विभागातील श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिराचा जीर्णोद्धार कार्य मार्च 2025 मध्ये पूर्ण झाला असून, मंदिर प्रथमच भक्तांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. तब्बल 125 वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात यंदाची आषाढी एकादशी खेंड आणि चिपळूण शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली.
आगामी रविवार, दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिकी एकादशीचा भव्य उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचे बांधकाम नव्याने पूर्ण झाले असून, मंदिराच्या नव्या रूपात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिर मंडळ, खेंड (ता. चिपळूण) यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन सोहळे यांचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या स्वरूपातील मंदिराचा भव्य नकाशा आणि रचना भक्तांना एक वेगळा आध्यात्मिक अनुभव देणारी ठरणार आहे.
सदर उत्सवासाठी अध्यक्ष आणि सदस्य, श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिर मंडळ, खेंड (ता. चिपळूण) यांनी सर्व भाविकांना प्रेमपूर्वक निमंत्रण दिले आहे.
“श्री विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात, या कार्तिकी एकादशीला भक्तीमय वातावरणात आपण सर्वांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन मंदिर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
