देवरुख मुस्लिम समाजासाठी सामाजिक हॉल मंजूर; आमदार शेखर निकम यांच्या शब्दपूर्तीबद्दल समाजाचा सत्कार
- by Yogesh Bandagale
- October 04, 2025
- 110 views
देवरुख, दि. ४ : देवरुख शहरातील मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र सामाजिक सभागृह (हॉल) आणि इतर विकासकामांसाठी आमदार शेखर निकम यांनी निधी मंजूर केला असून, या निर्णयाबद्दल मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीमंडळाने सावर्डे येथील आमदारांच्या संपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
मुस्लिम समाजाने गेल्या काही महिन्यांपासून विविध स्थानिक अडचणी आणि मागण्या आमदारांसमोर मांडल्या होत्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी होती — स्वतःच्या सामाजिक सभागृहाची. विवाह, धार्मिक कार्यक्रम, महिलांचे उपक्रम तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र व सुसज्ज हॉल आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले होते.
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शेखर निकम यांनी २०२५ च्या निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळत, जागेविषयी असलेली अडचण दूर करून सभागृहासाठी आवश्यक निधी मंजूर केला. “राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या वास्तविक गरजा ओळखून काम करणं हेच खऱ्या अर्थाने जनतेच्या आमदाराचं कर्तव्य आहे,” असे मत यावेळी आमदार निकम यांनी व्यक्त केले.
मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी यावेळी भावना व्यक्त करत म्हटले की, “शेखर निकम हे शब्दाला जागणारे आमदार आहेत. त्यांनी नेहमीच समाजाच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”
या भेटीवेळी रजाकभाई बोदले, हानिफभाई हरचिरकर, महमदभाई बोदले, नझीर भाई, मुबीन साटविलकर, हुसेन भाई, समीर भाई, अलताफ भाई, बाबामिया, अनवर भाई शिरगांवकर, हिदाम शेख, अयुब साठविलकर, मुराद बोदले आदी मान्यवर, पदाधिकारी आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.
