रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजप माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 58 views
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी रत्नागिरी नगरपालिकेतील स्वच्छतादूतांना स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे, हर्षवर्धन काटकर, प्रशासकीय अधिकारी श्री. बेहरे, विद्युत निरीक्षक जितेंद्र विचारे, आनंद थोरात, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, माजी नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, समीर तिवरेकर, मानसी करमरकर, भाजपाचे माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते.
स्वच्छतादूतांना गमबूट 100, घमेली 25, फावडे 25, खुरपे 50, कुदळ 25 आणि हॅन्डग्लोज 100 जोड्या वाटण्यात आल्या. त्यासोबत अल्पोपहाराचाही कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमाबद्दल स्वच्छतादूतांनी आभार मानून आमदार रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरीत निर्माण होणारा कचरा उचलून शहर स्वच्छतेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या स्वच्छतादूतांना साहित्याच्या कमतरतेमुळे काहीवेळा अडचणींना सामोरे जावे लागते. ती अडचण लक्षात घेऊन भाजपाच्या माजी नगरसेवकांनी स्वतः साहित्य खरेदी करून सन्मानपूर्वक वाटप केल्यामुळे स्वच्छतादूतांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. साहित्य मिळाल्यानंतर ते भाट्ये परिसरात स्वच्छतेच्या कामासाठी तातडीने रवाना झाले.
याप्रसंगी भाजपाचे माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी म्हणाले, “खरे काम हे स्वच्छतादूतच करत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे रत्नागिरी शहर स्वच्छ राहते. मात्र नागरिकांनीही कचरा रस्त्यावर न टाकता तो वर्गीकरण करून थेट कचरा गाडीतच द्यावा,” असे आवाहन केले.
