चिपळूणच्या ‘धामणवणे’त ८ फेब्रुवारीला ‘बांधावरचे संमेलन’
- by Yogesh Bandagale
- January 11, 2026
- 57 views
अध्यक्षपदी प्रा. सुहास बारटक्के; स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी
चिपळूण : शहरापासून जवळ असलेल्या धामणवणे येथील प्रसिद्ध श्रीविठलाई मंदिराच्या परिसरात काजूची बागेतील शेतजमिनीच्या बांधावर रविवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वा. या वेळेत आगळेवेगळे ‘बांधावरचे साहित्य संमेलन’ संपन्न होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा या संमेलनाची आयोजक संस्था असून कोकण मराठी साहित्य परिषद चिपळूण शाखा आणि साहित्य भारती चिपळूण शाखा सहयोगी संस्था म्हणून या संमेलनाच्या आयोजनात सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ ललित लेखक, कथाकार प्रा. सुहास बारटक्के हे भूषविणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून चिपळूण नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक, कवी शशिकांत मोदी यांची निवड एकमताने करण्यात आली आहे.
गाव आणि शहराच्या सीमा पुसून सर्व लिहित्या हातांना आणि गाणाऱ्या मनांना एकत्र आणणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. प्रा. बारटक्के यांच्या नावावर आजवर ३२ पुस्तके जमा आहेत. त्यांनी सातत्याने विविध मासिकांमध्ये तसेच दिवाळी अंकात कथा व लेख, वर्तमानपत्रांमध्ये सदरे आदी लेखन केले आहे. विविध संमेलने, साहित्यिक परिसंवाद, कथाकथन असा त्यांचा साहित्य क्षेत्रात विस्तारित वावर राहिलेला आहे. ‘संमेलनाध्यक्ष’ म्हणून त्यांनी संमेलनात उपस्थित राहाण्याची विनंती मान्य केली आहे. संमेलनातील महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद असलेल्या स्वागताध्यक्ष पदासाठी शशिकांत मोदी यांनी आयोजकांचे निमंत्रण स्वीकारले आहे. साहित्याची जाण असलेले मोदी हे स्वतः उत्तम कवी आहेत. विविध सामाजिक, साहित्यिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यात त्यांचे योगदान राहिलेले आहे. या संमेलनात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे हेही उपस्थित राहाणार असून ते संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष असतील. दिवसभराच्या संमेलनात एकूण सहा सत्र असतील. ज्यात उद्घाटनासह कविता-तंत्र आणि मंत्र, कथाकथन, कोकणातील शेती संस्कृतीशी संबंधित बांधावरची गाणी, कवीसंमेलन,समारोप यांचा समावेश राहिल. संमेलनातील नाष्टा, चहापान, भोजन आदी व्यवस्था अगदी घरगुती ग्रामीण कोकणी पद्धतीच्या असतील. नेहमीच्या संमेलनातील मंडप, स्टेज, खुर्ची आदी बाबींना मर्यादेत ठेवून काजूच्या झाडांच्या घनदाट छायेतील रम्य वातावरणात हे संमेलन संपन्न होणार आहे.
संमेलनाच्या नियोजनाबाबत नुकतीच एक बैठक चिपळूणातील सर्व साहित्य संस्थांची मातृसंस्था असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात संपन्न झाली. मराठी साहित्य क्षेत्रातील अभिनव प्रयोग असलेल्या बांधावरच्या संमेलनात साहित्य रसिकांसाठी मर्यादित प्रवेश असणार आहे. या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रसिकांनी वीणा परांजपे यांच्याशी मो. +91-9763281358 येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
