संध्या दाभोळकर यांच्या जागतिक कामगिरीबद्दल खेर्डीत सत्कार

चिपळूण, दि. २६ (प्रतिनिधी): जगप्रसिद्ध बीएमडब्ल्यू बर्लिन वर्ल्ड मॅरेथॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत चिपळूण आणि कोकणाचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या सौ. संध्या संतोष दाभोळकर यांचा भव्य सत्कार समारंभ खेर्डी येथे पार पडला. या सत्कार सोहळ्याचे आयोजन भाजप नेते व वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रमात सौ. संध्या दाभोळकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. संतोष दाभोळकर, भाजपचे ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, माजी सरपंच सुनील मेस्त्री, रवींद्र फाळके, माजी उपसरपंच बापू राऊत, अर्बन बँकेचे संचालक निलेश भुरण, तसेच नाना शेंबेकर, गजानन जाधव, अनिल लांजेकर, अमोल महाडिक, रवींद्र भिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

संध्या दाभोळकर या गेली १२ वर्षे विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेत असून, त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन, टीसीएस बंगलोर, एअरटेल दिल्ली, सातारा हिल मॅरेथॉन, नेव्ही मॅरेथॉन अशा शर्यतींमध्ये आपला ठसा उमठवला आहे. विशेष म्हणजे, बर्लिन मॅरेथॉनमध्ये संधी मिळालेल्या केवळ दोन भारतीय महिला धावपटूंमध्ये त्यांचा समावेश होता, जो चिपळूणकरांसाठी अभिमानास्पद ठरला.

त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीत सचिन तेंडुलकर IDBI मॅरेथॉन ब्रँड अॅम्बेसिडर, नायकी अॅम्बेसिडर, कोकण व कुंडलिका मॅरेथॉनमधील विजेतेपदे, अशा २०० हून अधिक मॅरेथॉन स्पर्धांचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे.

प्रशांत यादव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "संध्या ताईंचा प्रेरणादायी प्रवास हा चिपळूणमधील नव्या पिढीसाठी आदर्श आहे. त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि चिकाटी कोकणातील युवक-युवतींसाठी दीपस्तंभ ठरेल."

संबंधित लेख