अवधूत गुप्तेंची वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट
- by Yogesh Bandagale
- January 10, 2026
- 219 views
चिपळूण : “मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही, कोकणी आदमी के बस का काम नही है, असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा प्रकल्प आहे,” अशा शब्दांत प्रसिद्ध मराठमोळे गायक अवधूत गुप्ते यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे मनापासून कौतुक केले. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी ही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
वाशिष्ठी डेअरीचे प्रत्येक दूध व दुग्धजन्य उत्पादन दर्जेदार आणि अप्रतिम असल्याचे सांगत, “चिपळूणला या, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला भेट द्या आणि या उत्पादनांचा आस्वाद घ्या,” असे आवाहनही गुप्ते यांनी यावेळी केले.
वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून, गुरुवारी रात्री अवधूत गुप्ते यांच्या गीतांचा उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम झाला. त्यानंतर शुक्रवारी गुप्ते यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या निवासस्थानी साई मंदिराला भेट देत दर्शन घेतले. पुढे पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, कु. स्वामिनी यादव यांच्या हस्ते अवधूत गुप्ते आणि प्रसिद्ध समालोचक अभिजीत गोडबोले यांचे स्वागत करण्यात आले.
प्रकल्पाची पाहणी करताना प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरीची संपूर्ण संकल्पना, कार्यपद्धती व वाटचाल याची माहिती दिली. त्यानंतर संवाद साधताना गुप्ते म्हणाले, “वाशिष्ठी कृषी महोत्सवात प्रशांत यादव यांच्यावर जनतेचे असलेले प्रेम पाहून मी थक्क झालो होतो. मात्र आता प्रत्यक्ष वाशिष्ठी डेअरी प्रकल्प पाहिल्यानंतर आणखी भारावून गेलो आहे.”
ते पुढे म्हणाले, “कोकणी मराठी माणूस प्रगती करू शकत नाही, हा गैरसमज मोडीत काढणारा हा प्रकल्प आहे. वाशिष्ठी डेअरीचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्तम दर्जाचे आहेत. कुठेही ‘वाशिष्ठी डेअरी’ असा बोर्ड दिसला, तर बिनधास्त खरेदी करा,” असे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात वाशिष्ठी डेअरी नावारूपास येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वाशिष्ठी डेअरीचे संचालक अविनाश गुडेकर, जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, मॅनेजर प्रदीप मगदूम, मार्केटिंग मॅनेजर तानाजी निंबाळकर, अकाउंट मॅनेजर विजय वाजे, सामाजिक कार्यकर्ते रमण डांगे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल पवार यांच्यासह डेअरीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
