१२०० आरोग्य दूतांसाठी कर्करोग - माता व बाल आरोग्याची विशेष कार्यशाळा
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 90 views
चिपळूण, ता. २४ : ग्रामीण भागातील महिला आणि बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी 'बी. के. एल. वालावलकर रुग्णालय' आणि मुंबईचे 'टाटा मेमोरियल हॉस्पिटल' यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यातील ७५० अंगणवाडी सेविका आणि ४५० आशा स्वयंसेविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
स्त्री सक्षमीकरण आणि राष्ट्रविकास
कार्यशाळेचे उद्घाटन करताना वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणावर भर दिला.
"आरोग्य सेविका हा समाजाचा आरसा आहेत. तुम्ही सक्षम झालात तरच देश बलशाली होईल. आरोग्य कार्यातून आपण राष्ट्र उभारणीचे मोठे काम करत आहोत," असे प्रतिपादन त्यांनी केले.
कर्करोग निदानाचे विशेष प्रशिक्षण
या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण म्हणजे टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 'प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी' (प्रतिबंधात्मक कर्करोग विभाग) विभागाचे योगदान. डॉ. शर्मिला पिंपळकर आणि त्यांच्या टीममधील डॉ. विजयलक्ष्मी राव व डॉ. प्रतिभा पाटील यांनी महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या मुखाचा कर्करोग (Oral Cancer), गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) आणि स्तनांच्या कर्करोगाची (Breast Cancer) लक्षणे कशी ओळखावीत, याचे सखोल प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागात या आजारांचे वेळीच निदान व्हावे, यासाठी त्यांनी प्रत्यक्ष तपासणीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले.
आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी आपली उपस्थिती दर्शवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी नवीन वर्षाचे औचित्य साधून त्यांनी सर्व सेविकांना 'आरोग्यदायी जीवनशैली' अंगीकारण्याचे आवाहन केले. नियमित व्यायाम आणि सकस आहार हाच निरोगी जीवनाचा मंत्र असून, आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतः फिट राहून समाजासमोर आदर्श ठेवावा, असे त्यांनी सुचवले.
तज्ज्ञ डॉक्टरांचे तांत्रिक मार्गदर्शन
या कार्यशाळेत विविध वैद्यकीय विषयांवर सखोल सत्रे घेण्यात आली:
स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ : डॉ. अनघा मोडक व डॉ. विलास देशमुख यांनी माता आरोग्य आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी HPV लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.
बालरोग तज्ञ : डॉ. पार्वती हळबे, डॉ. अंकिता सुर्वे, डॉ. नताशा कानविंदे आणि डॉ. तनिषा यांनी स्तनपानाची योग्य पद्धत आणि त्याचे महत्व तसेच मुलांमधील लसीकरण मोहिमेचे अपग्रेडेशन आणि बालरोग ओळखण्याबाबत मार्गदर्शन केले.
कम्युनिटी मेडिसिन: डॉ. गजानन वेल्हाळ व डॉ. मोनिषा नायर यांनी असंसर्गजन्य आजार टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायांवर प्रकाश टाकला.
मानसिक आरोग्य: मानसशास्त्रज्ञ स्वाती सोनावणे आणि रुपाली चव्हाण यांनी मुलांमधील मानसिक विकारांची ओळख व पालकांचे समुपदेशन यावर मार्गदर्शन केले.
बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाने राबवलेल्या या व्यापक प्रशिक्षण मोहिमेमुळे कोकणातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेला मोठी ताकद मिळाली आहे. या उपक्रमामुळे कर्करोग आणि बालकांच्या आजारांचे लवकर निदान होऊन मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी व्यक्त केला.
