हातीव (मोर्डे) गणात मंगेश बांडागळे यांच्या गावोगावी बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Yogesh Bandagale
- December 14, 2025
- 284 views
देवरुख : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. हातीव (मोर्डे) पंचायत समिती गणामध्ये आमदार शेखर निकम यांचे विश्वासू सहकारी मंगेश बांडागळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीकडून ते ही निवडणूक लढवणार असून, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.
मोर्डे, वांझोळे, मुरादपूर, हटाव, निवे, अंगवली, सोनारवाडी, निगुडवाडी, करंबेळे, देवळे, बोंडे आदी गावांमध्ये मंगेश बांडागळे यांनी छोट्या-छोट्या गाव बैठकींवर भर दिला आहे. या बैठकींना मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती लाभत असून, स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद साधला जात आहे. बैठकीदरम्यान आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे, मुरादपूर गावचे सरपंच म्हणून प्रशासनाचा घेतलेला अनुभव, तसेच भविष्यात पंचायत समिती व आमदार शेखर निकम यांच्या सहकार्याने विकासाला कशी गती देता येईल, याबाबत ते सविस्तर माहिती देत आहेत. यासोबतच स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजनांची आश्वासनेही दिली जात आहेत.
नुकतीच मुरादपूर पातीची वाडी येथे झालेल्या बैठकीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या बैठकीस भाजपचे सचिन बांडागळे, निवृत्त शिक्षक रवींद्र बांडागळे, सरपंच दीक्षा बांडागळे, दिनेश बांडागळे, गावचे फौजदार गणेश बांडागळे यांच्यासह पातीची वाडी, उगवतीतील वाडी येथील ज्येष्ठ नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत विकास, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
