सावर्डे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
- by Yogesh Bandagale
- January 04, 2026
- 53 views
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचालित गोविंदरावजी निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा राजे शिर्के यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोगतामध्ये सकाळ सत्रात कु. मृण्मयी घाणेकर व दुपार सत्रात कु. कृष्णा खापरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती प्रभावीपणे मांडली.
यावेळी सहाय्यक शिक्षिका स्फूर्ती जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या अमूल्य कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता विशद केली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित भित्तिपत्रकाचे उद्घाटन शिक्षक अशोक शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच, बालिका दिनानिमित्त ज्या विद्यार्थिनींचे वाढदिवस होते, त्या विद्यार्थिनींचा विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाची सांगता कु. सिद्धी सावंत हिने आभार प्रदर्शन करून केली. कार्यक्रमाचे आयोजन सकाळ सत्रात श्रीमती कविता हळदीवे व दुपार सत्रात सौ. वर्षा चव्हाण यांनी केले.
बालिका दिनानिमित्त वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थिनींचा सन्मान करताना बी. एल. ओ. वैशाली कदम व प्राचार्य राजेंद्र वारे उपस्थित होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्त्रीशिक्षणाचे महत्त्व, समानता व सामाजिक जागरूकतेची जाणीव निर्माण करणारा ठरला.
