संगमेश्वर स्थानकावर अतिरिक्त गाड्यांच्या थांब्याची मागणी पुन्हा चर्चेत
- by Yogesh Bandagale
- October 30, 2025
- 108 views
देवरुख : काल देवरुख येथे झालेल्या खासदारांच्या जनता दरबारात संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय पुन्हा एकदा अग्रक्रमाने मांडण्यात आला. सकाळी लवकरच निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, सहकारी अशोक मुंडेकर व समन्वयक रुपेश मनोहर कदम हे लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात उपस्थित राहून हा विषय खासदारांसमोर मांडला.
संगमेश्वर स्थानकावर दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता ९ अतिरिक्त गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी या ग्रुपतर्फे कोंकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. यावेळी झालेल्या बैठकीत कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी जामनगर, पोरबंदर आणि मडगाव एक्सप्रेस या तीन गाड्यांच्या थांब्यास सर्व बाबी अनुकूल असल्याचे सांगत केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीला स्थानिक आमदार शेखर निकम उपस्थित होते. त्यांनीदेखील या मागणीस स्वतःच्या पत्राद्वारे शिफारस केली होती.
रेल्वे प्रशासनानुसार, थांबे मंजूरीचा विषय हा केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अखत्यारीत येत असल्याने स्थानिक खासदारांची शिफारस आवश्यक होती. त्यानुसार मे २०२५ मध्ये खासदार नारायण राणे यांना भेटून हा विषय त्यांच्या समोर मांडण्यात आला. त्यांनी रेल्वे मंत्र्यांना शिफारसपत्र दिले असून, “दोन दिवसांतच मंजूरी मिळवतो” असे आश्वासनही दिले होते. मात्र सहा महिने उलटूनही थांब्यांना मंजूरी मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर काल देवरुख येथे झालेल्या जनता दरबारात पुन्हा हा प्रश्न खासदारांसमोर मांडण्यात आला.
उत्तर देताना खासदार नारायण राणे म्हणाले, माझे मित्र असलेले केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे मी थांबे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो.”
