श्री क्षेत्र गांधारेश्वर येथे श्री भवानी देवीचा शाकंभरी पौर्णिमा उत्सव

३ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

चिपळूण : चिपळूण शहरातील सुप्रसिद्ध जागृत श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट अंतर्गत श्री काळभैरव पंचायतन परिवारातील श्री देवी भवानी मंदिर, श्री क्षेत्र गांधारेश्वर येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री शाकंभरी पौर्णिमा (पौष पौर्णिमा) उत्सव शनिवार, दि. ०३ जानेवारी रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिभावात साजरा होणार आहे.

उत्सवानिमित्त सकाळी ६ वाजता श्री भवानी मातेची पंचामृती पूजा व अभिषेक, त्यानंतर सकाळी ७ ते १२.३० या वेळेत श्री सत्य अंबा पूजा, देवीसूक्त हवन, पूर्णाहुती व आरती होणार आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसाद देण्यात येणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ, चिपळूण यांचे संगीत भजन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कै. वामनराव सांडविलकर संस्थापित स्वरदर्शन कलाकुंज प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. रात्री ८.३० वाजता महाआरती होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.

ग्रामदैवता श्री देवी भवानी मातेच्या शाकंभरी पौर्णिमा उत्सवात भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच श्री देव भैरी (काळभैरव) व श्री देवी भवानी (भैरी भवानी) कुलदैवत असलेल्या भक्तांनी या पावन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख