संगमेश्वरात जाखमाता देवीचा ‘शिंपणे’ उत्सव जल्लोषात साजरा
- by Yogesh Bandagale
- March 18, 2026
- 107 views
संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील कसबा परिसरात देवी जाखमातेचा पारंपरिक ‘शिंपणे’ उत्सव बुधवारी अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी या उत्सवासाठी हजेरी लावत परिसर भक्तिमय आणि रंगमय झाला.
उत्सवाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात काढल्या जाणाऱ्या पारंपरिक फेऱ्यांनी झाली. सकाळी ६ वाजल्यापासून रंगांच्या उधळणीला प्रारंभ झाला होता. दुपारी सुमारे ३ वाजता मोठ्या वाहनांमधून लाल रंगाचे पाणी आणून फेऱ्यांमध्ये सहभागी भाविकांवर उधळण्यात आले. रस्त्यांवर तसेच घरांच्या गच्च्यांवरूनही रंगांची बरसात होत असल्याने संपूर्ण कसबा परिसर लाल रंगाने न्हाऊन निघाला.
दुपारनंतर उत्सवाला अधिकच रंग चढला. ढोल-ताशा, झांज पथक आणि डीजेच्या तालावर हजारो भाविकांनी नृत्य करत आनंद लुटला. जवळपास पाच ते सहा तास हा जल्लोष सुरू होता.
उत्सवादरम्यान प्रत्येक घरात मटण-भाकरी, वडे यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा बेत करण्यात आला होता. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना रंगवत आनंद साजरा करत होते. विशेषतः ‘जावई’ मानाचा असल्याने त्याला रंगवण्याची परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली. महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
धार्मिक विधींचा भाग म्हणून कसबा येथील चंडिका मंदिर, संगमेश्वर येथील निनावी व जाखमाता मंदिर तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती.
दुपारनंतर देवाला ‘रखवाली’ देण्याची परंपरा पार पडली. यामध्ये नारळ, कोंबडे व बकऱ्यांचा समावेश होता. यापासून तयार करण्यात आलेला प्रसाद आणि रात्री हौद फोडल्यानंतरचा प्रसाद एकत्र करून हजारो भाविकांना मटण-भाकरीचे वाटप करण्यात आले.
रात्री सुमारे १० वाजता पारंपरिक विधीनुसार मानकरी मंडळींच्या उपस्थितीत पाण्याचा हौद फोडण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता करण्यात आली.
उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल उत्सव समितीने भाविकांचे आभार मानले.
