शहीदी समागमानिमित्त चिपळूणमध्ये भव्य आरोग्य शिबिर
- by Yogesh Bandagale
- February 13, 2026
- 44 views
चिपळूण : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त चिपळूण येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विविध आरोग्य सेवा, तपासण्या, उपचार, मार्गदर्शन, शस्त्रक्रिया सल्ला, सोनोग्राफी तसेच औषधोपचार आदी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
उपजिल्हा रुग्णालय, चिपळूण येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन दोन लहान बालरुग्ण व महिला रुग्णांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमास इंडियन मेडिकल असोसिएशन वुमन डॉक्टर्स विंग, चिपळूण यांचे विशेष सहकार्य लाभले.
कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. असित नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशन वुमन डॉक्टर विंग महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कांचन मदार, बालरोगतज्ज्ञ डॉ. रुपाली कुष्टे, फिजिशियन डॉ. मृणाली भुवड, डॉ. चिन्मय जाधव, डॉ. गवळे, डॉ. अवघडे, डॉ. कांबळे, डॉ. कापुरे, डॉ. बिरवाडकर, डॉ. शिंदे आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली.
या शिबिराचा सुमारे 150 लाभार्थी रुग्णांनी लाभ घेतला. उपस्थित रुग्णांनी समाधान व्यक्त करत शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. अशा प्रकारचे पुढील शिबिर 16 व 23 तारखेला आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मदार यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.
