वेरवलीत जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
- by Yogesh Bandagale
- February 13, 2026
- 99 views
लांजा: वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित शैलेश रमेश डोळस विद्यानगरीतील श्रीराम विद्यालय, तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय व का. रा. कोळवणकर यामहा ट्रेनिंग स्कूल येथे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संस्थेचे सचिव श्री संतोष पडवणकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार श्री अनिल गोसावी, लेखक-दिग्दर्शक व सिने-नाट्य अभिनेते असित रेडीज, राजापूर-लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सुभाष लाड, लांजा नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप, लांजा पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. देवकन्या मेंदळे, संचालक श्री श्रीकृष्ण सरदेसाई, सहसचिव श्री सुरेश चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष तथा सिने-नाट्य अभिनेते अमोल रेडीज, संचालक श्री रवींद्र डोळस, वेरवली बुद्रुकच्या सरपंच सौ. वेदा कोळवणकर, वेरवली खुर्दचे उपसरपंच श्री सुरज कुरतडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री पंढरी गुरव तसेच विद्यार्थी सुरक्षा समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी, कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कारार्थींची यादी पुढीलप्रमाणे —
कै. गंगाधर उर्फ भाईसाहेब लाड जिल्हास्तरीय जीवन गौरव पुरस्कार – श्री विजय शिवराम बेर्डे
स्व. रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार – श्री दीपक दत्ताराम नागवेकर
स्व. रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पुरस्कार – श्री शशांक उपशेट्टये
आदर्श समाजभिमुख पत्रकारिता पुरस्कार – श्री प्रमोद कोनकर
कै. मनोहर विठोबा उर्फ डॅडी कोकाटे जिल्हास्तरीय उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कार – श्री अनिकेत चव्हाण
स्व. रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय कला गौरव पुरस्कार – श्री धीरज साठविलकर
स्व. रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार – श्री शरद वासुदेव चव्हाण
कै. का. रा. उर्फ भाईसाहेब कोळवणकर जिल्हास्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार – जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, लांजा
स्व. रमेश धोंडू डोळस तालुकास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार – श्री सिताराम कदम
स्व. रमेश धोंडू डोळस तालुकास्तरीय आदर्श कर्मचारी पुरस्कार – श्री शशिकांत बाबल्या चव्हाण
कै. बाळशेठ कोळवणकर आदर्श शेतकरी पुरस्कार – श्री सूर्यकांत रघुनाथ सरदेसाई
पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रांगणात ढोल-ताशांच्या जल्लोषात झाली. टोयो सांस्कृतिक सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ मान्यवरांचे व सत्कारमूर्तींचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. माता सरस्वतीच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून सोहळ्याचा प्रारंभ झाला. मुख्याध्यापक श्री अरुण डोळे यांनी सर्व मान्यवरांचे लेखणी देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात श्री अमोल रेडीज यांनी शाळेची प्रगती व सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला.
मनोगत व्यक्त करताना श्री सुभाष लाड यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती दीपक नागवेकर व धीरज साठविलकर यांनी संस्थेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात श्री संतोष पडवणकर यांनी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी अशा व्यक्तींपासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षक, पालक, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री सचिन कांबळे व श्री विनोद बंडगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री अरुण डोळे यांनी केले.
