वृक्ष लागवड व संवर्धनाची गरज : रंजनसिंह परदेशी
- by Yogesh Bandagale
- December 19, 2025
- 96 views
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे महाराष्ट्र शासन वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभाग, रत्नागिरी (चिपळूण वनपरिक्षेत्र) यांच्या वतीने हरित सेना उपक्रमांतर्गत सीड बॉल मेकिंग हा पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.
महाराष्ट्र शासनाची हरित सेना ही पर्यावरण संवर्धन मोहीम असून वृक्षलागवड, वन व वन्यजीव संरक्षण तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती करून लोकसहभाग वाढविणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांत विद्यार्थी, नागरिक व विविध संस्था सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतात.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वनरक्षक श्री. अर्जुन जाधव यांनी हरित सेनेचे उद्दिष्ट, कार्यपद्धती तसेच सीड बॉल मेकिंग उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात वनक्षेत्रपाल (सामाजिक वनीकरण विभाग, चिपळूण) श्री. रंजनसिंह परदेशी यांनी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची सवय अंगीकारणे ही आजच्या काळाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. अशा उपक्रमांमुळे पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होऊन भावी पिढीसाठी निसर्गाचे रक्षण होते, असेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यालयाच्या व्हर्टिकल्चर विभागाचे प्रा. संदीप पवार यांनी “वृक्ष ही देशाची संपत्ती आहे” हा संदेश देत सीड बॉल मेकिंगचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. बियापासून रोपे कशी तयार होतात याची माहिती त्यांनी आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांसह प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगितली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
या उपक्रमाचे नियोजन वनपाल सौ. सिद्धी खेडेकर व सौ. समृद्धी आतकरी तसेच वनरक्षक श्री. अर्जुन जाधव यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. राजेंद्रकुमार वारे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमास हरित सेनेचे विद्यार्थी तसेच इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरित सेना विभागप्रमुख श्री. साजिद चिकटे यांनी कार्यक्रमाचे समन्वयकत्व यशस्वीरीत्या सांभाळले.
यावेळी श्री. अर्जुन जाधव यांनी हरित सेनेची स्थापना 2007 साली झाल्याची माहिती देत चिपळूण तालुक्यातील 44 शाळा हरित सेनेशी संलग्न असल्याचे सांगितले तसेच विविध पर्यावरणपूरक योजनांची माहिती दिली. वनक्षेत्रपाल श्री. रंजनसिंह परदेशी यांनी विद्यालयाच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल व विद्यार्थ्यांनी राबविलेल्या पर्यावरणविषयक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला विद्यालयाची उपप्राचार्य विजय चव्हाण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचा समारोप श्री. सुधीर कदम यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.
