विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांचा मुंबई विद्यापीठात सन्मान
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 35 views
देवरूख : भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्ली आणि मुंबई विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल (पुरुष) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांना महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ललित कला प्रकारांसाठी दिलेले सातत्यपूर्ण व उत्कृष्ट मार्गदर्शन तसेच विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सादर केलेल्या उल्लेखनीय रांगोळी कलेबद्दल रहाटे यांना या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या निमित्ताने गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अजिंक्य नाईक (अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशन) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी होते.
सन्माननीय अतिथींमध्ये प्राचार्य (डॉ.) अजय भामरे (प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ), गोविंद मुथूकुमार (महासचिव, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन), डॉ. राजेश सोबती (निरीक्षक, भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्ली), डॉ. मनोज रेड्डी (संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण, मुंबई विद्यापीठ) तसेच डॉ. प्रसाद कारंडे (कुलसचिव, मुंबई विद्यापीठ) उपस्थित होते.
हा भव्य कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुल, विद्यानगरी, कलिना, सांताक्रुझ येथे पार पडला. रहाटे यांना विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील तसेच मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व प्रोत्साहन लाभत असल्याचे सांगण्यात आले.
