वर्ग आणि मैदान यांचा समन्वय साधण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 75 views
डीबीजे स्नेहसंमेलनात डॉ. संतोष चव्हाण यांचे प्रतिपादन
चिपळूण, दि. २३/१२/२०२५ – नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी.जे. महाविद्यालय (स्वायत्त), चिपळूणच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आज वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने झाली. उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीसरस्वती पूजन करून करण्यात आले.
नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. मंगेश तांबे यांनी प्रमुख पाहुणे सौ. श्रद्धा उदेग-पवार यांचे स्वागत केले. संस्थेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री. वामन जोशी यांनी डॉ. संतोष चव्हाण यांचे शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला, तर प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी रोपटे देऊन हृद्य स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या कामगिरीचा संक्षिप्त आढावा घेतला. यानंतर श्री. वामन जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. सर्वांगीण विकास, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक आहे.”
कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा अहवाल क्रीडासमन्वयक प्रा. विलास जोशी यांनी तर वरिष्ठ महाविद्यालयाचा अहवाल क्रीडासमन्वयक प्रा. डॉ. सम्राट माने यांनी सादर केला.
प्रमुख पाहुणे सौ. श्रद्धा पवार म्हणाल्या, “आपल्या महाविद्यालयाने अनेक खेळाडू घडविले आहेत. खेळाडूंनी खेळासोबतच नोकरी आणि व्यवसायाचा विचार करणे आवश्यक आहे. वरिष्ठ पातळीवर योग्य मदत मिळावी, यासाठी मी शक्य तितकी मदत करीन.”
दुसरे प्रमुख पाहुणे डॉ. संतोष चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “हे महाविद्यालय माझे हक्काचे घर आहे. विद्यार्थिजीवनात खेळ आणि अभ्यास दोन्ही महत्त्वाचे आहेत. वर्ग आणि मैदान यांचा समन्वय साधण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. खेळाबरोबरच प्रत्येक खेळाडूने ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा, परंतु अभ्यास कधीही सोडू नये.” त्यांनी आपल्या जुन्या स्मृती उजाळा देत सांगितले की, “पूर्वी सी. के. नायडू करंडक स्पर्धा जिंकू शकलो नाही, परंतु आता आपल्या संघाने ती जिंकावी.”
त्यांनी माजी क्रीडा गुरु प्रा. जीवनराज कांबळे, प्रा. उल्हास मोहिते आणि प्रमुख मार्गदर्शन श्री. मंगेश तांबे यांचा शाल व मानचिन्ह देऊन हृद्य सत्कार केला.
यानंतर वार्षिक क्रीडा पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्रीडाप्रकारांत घवघवीत यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचा गौरव केला गेला. पारितोषिकांचे वाचन प्रा. उल्हास मोहिते, प्रा. जीवनराज कांबळे, प्रा. राम कदम, प्रा. प्रशांत चव्हाण, प्रा. सोनाली खर्चे आणि डॉ. माधवी जोशी यांनी केले.
आभार प्रदर्शन क्रीडा प्रतिनिधी कु. आर्या तांबे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय प्रा. सोनाली खर्चे आणि प्रा. मयूर रामटेके यांनी केला. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ ने झाली.
