लोटेतील गुरुकुलातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; भगवान कोकरे महाराज व सहकारी अटकेत
- by Yogesh Bandagale
- October 14, 2025
- 1123 views
खेड : तालुक्यातील लोटे येथे असलेल्या “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल”मध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भगवान कोकरे महाराज आणि त्यांचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्याविरोधात भारतीय दंडसंहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पीडिता काही काळापासून गुरुकुलात राहून आध्यात्मिक शिक्षण घेत होती. या काळात गुरुकुल प्रमुख भगवान कोकरे महाराज यांनी तिच्याशी वारंवार अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचे नमूद आहे. सुरुवातीला तिने हा प्रकार गुरुकुलातील एका सदस्याला सांगितल्यावर, त्याने “महाराजांची सामाजिक आणि राजकीय ओळख आहे, कोणी काही बोलू नकोस” असे सांगत तिला धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पुढे वारंवार असे प्रकार घडत राहिल्यानंतर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी थेट खेड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी भगवान कोकरे महाराज व प्रितेश कदम यांना ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणामुळे धार्मिक संस्थांमध्ये आणि समाजात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घटनास्थळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सणस आणि पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
