राम आळी नाक्यावर उकळत्या तेलाची कढई उलटली; चार ते पाच नागरिक भाजले
- by Yogesh Bandagale
- January 10, 2026
- 117 views
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील राम आळी नाका परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. चिप्स बनविणाऱ्या दुकानासमोर उकळत्या तेलाच्या कढईत अचानक आलेल्या एका मोकाट गाईने तोंड घातल्याने कढई उडाली. यामध्ये आजूबाजूला उपस्थित असलेले चार ते पाच नागरिक गंभीररीत्या भाजले, तर संबंधित गायही भाजली.
राम आळी नाक्यावरील एका दुकानासमोर उकळत्या तेलात चिप्स बनविण्याचे काम सुरू असतानाच अचानक एक उनाड गाय त्या ठिकाणी आली. उकळत्या तेलाच्या कढईकडे तोंड घालताच गाय भाजली. वेदनेने संतप्त झालेल्या गाईने शिंगाने कढई उडवली. त्यामुळे उकळते तेल परिसरात उडाले आणि जवळ उभे असलेले चार ते पाच नागरिक भाजले.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमी नागरिकांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात बेधडक फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून यापूर्वीही अशा प्रकारांमुळे अपघात घडले आहेत. मात्र नगरपालिकेकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या प्रकारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मोकाट गुरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
