चिपळूणात ‘तबला अभिवादन’ कार्यक्रमात सांगीतिक श्रद्धांजली

चिपळूण : संगीतझरा तबला ढोलकी क्लासेस चिपळूण यांच्या वतीने ज्येष्ठ तबलावादक पंडीत अरविंद मुळगांवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘तबलाअभिवादन’ हा सांगीतिक श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. चिपळूणातील संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात संगीतझरा क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी तबलावादन सादर केले. त्यानंतर विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ, चिपळूण तसेच विद्याभारती गुरुकुल चिपळूण येथील विद्यार्थ्यांनीही तबलावादन सादर केले. पुढे संगीतझरा क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी ढोलकीवादन करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळवली. सर्व विद्यार्थ्यांनी गुरू यदुवीर भिकाजी चोगले यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मविश्वासपूर्ण आणि दर्जेदार सादरीकरण केले. प्रथम सत्रात लेहरा साथ कु. श्रेयश जंगम यांनी दिली.

द्वितीय सत्रात पंडीत मुळगांवकर यांचे पट्टशिष्य वैष्णव चव्हाण (मुंबई) यांचे एकल तबलावादन रंगले. त्यांनी पारंपरिक रचना आणि वैशिष्ट्यपूर्ण बंदिशी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना लेहरा साथ श्री. अमित ओक यांनी केली.

यानंतर ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांच्या शिष्या सुश्री धनश्री अभ्यंकर यांचे शास्त्रीय गायन सादर झाले. त्यांनी राग भीमपलासमध्ये ख्याल गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संवादिनी साथ श्री. अमित ओक यांनी, तर तबला साथ श्री. वैष्णव चव्हाण यांनी केली.

कार्यक्रमास कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर, गायक सतीश कुंटे, लोकशाहीर भिकाजी चोगले, विजय जोशी, तबलावादक दिलीप संकपाळ, नंदा संकपाळ, उत्तरा भागवत, सुहास कुंभार, चंद्रकांत सूर्यवंशी, संकेत कुलकर्णी, प्रसाद शेंबेकर, राहुल साडविलकर, सुरेश तांबे, सुधाकर केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. तेजानंद गणपत्ये, अश्विनी गणपत्ये, जान्हवी टाकळे (मुख्याध्यापिका), मोहन भिडे (प्रबंधक) यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे निवेदन मयुरेश भागवत यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी यदुवीर चोगले यांच्या कार्याचे कौतुक करत गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. भविष्यातही त्यांच्या विद्यार्थ्यांकडून संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित लेख