राजापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र खामकर यांचा तडकाफडकी राजीनामा
- by Yogesh Bandagale
- January 15, 2026
- 43 views
राजापूर : राजापूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी आपल्या पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरुद्दीन सय्यद यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात खामकर यांनी वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे.
राजापूर तालुक्यात काँग्रेसची स्थिती काही काळ अत्यंत बिकट होती. अशा परिस्थितीत पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जितेंद्र खामकर यांनी संघटन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुन्हा उभारी मिळाली होती.
नुकत्याच पार पडलेल्या राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व मनसे यांच्यासोबत एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह काँग्रेसचे सात नगरसेवक, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तीन नगरसेवक निवडून आले. नगर परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण होते.
अशा सकारात्मक पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत असतानाच तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
जिल्हाध्यक्ष नरुद्दीन सय्यद यांना पाठविलेल्या पत्रात खामकर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिलेल्या संधीबद्दल तसेच नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच राजापूर तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचा हा तडकाफडकी राजीनामा पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी आव्हान ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
