राजापूर घरफोडी प्रकरणाचा छडा; दोन आरोपी अटकेत, स्कॉर्पिओसह मुद्देमाल जप्त

राजापूर : राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व राजापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून स्कॉर्पिओ वाहनासह घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १.३० वाजता राजापूर तालुक्यातील कोळवणखडी (खालची मोरेवाडी) येथील रहिवासी सदानंद शांताराम मोरे (वय ५५) यांच्या घरात चार अज्ञात इसमांनी घरफोडी केली होती. दोन आरोपींनी किचनच्या खिडकीतून, तर उर्वरित दोघांनी मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करत पैशांचा डब्बा चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २१७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) व ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. स्थानिक सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा धाराशिव जिल्ह्यातील सुनील पवार व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात शोधमोहीम राबवली. अखेर २१ डिसेंबर २०२५ रोजी इंदापूर हायवे येथे सापळा रचून सुनील भिमा पवार (वय २७, रा. मोहा, जि. धाराशिव) व अजय उतरेश्वर गवळी (वय २०, रा. पिंपळवाडी, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी दोन साथीदारांची ओळख पटली आहे. त्यांचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव तसेच त्यांच्या पथकाने पार पाडली.

संबंधित लेख