रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक
- by Yogesh Bandagale
- November 01, 2025
- 51 views
रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना “केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (तपास) – 2025” जाहीर झाले आहे. स्पेशल ऑपरेशन, तपास आणि फॉरेन्सिक सायन्स क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या कार्याची केंद्र सरकार पातळीवर दखल घेत ही प्रतिष्ठित मानाची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
सन २०१८ मध्ये सांगली जिल्ह्यातील कुरळप येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना पाटील यांनी एका आश्रमशाळेतील मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा गुप्त अर्ज मिळाल्यावर संवेदनशीलतेने व तातडीने कारवाई केली होती.
या प्रकरणात त्यांनी एका महिला उपनिरीक्षकाला गुप्त छडा लावण्यासाठी त्या ठिकाणी पाठवले. स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आरोपींच्या कृत्याचा निर्णायक पुरावा मिळवून आश्रमाचे संस्थापक व त्यांची महिला मदतनीस यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.
या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली, ज्यामुळे पीडित मुलींना न्याय मिळाला.
रत्नागिरी शहरात पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतरही पाटील यांनी गुन्हे तपासातील वेग आणि अचूकता कायम ठेवली. जवळपास 8 महिने ठप्प असलेला जयगड तिहेरी हत्याकांडाचा तपास त्यांनी केवळ 48 तासांत उघडकीस आणून आरोपींना बेड्या ठोकल्या.
साधेपणा, शांत स्वभाव, पण तितकाच अचूक तपास आणि गुन्ह्याचा छडा लावण्याची क्षमता यामुळे पोलीस निरीक्षक विवेक पाटील रत्नागिरीतील जनमानसात आदराचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.
शहरवासीयांकडून आणि पोलिस दलातर्फे त्यांचे अभिनंदन होत आहे.
