रत्नागिरीत विद्यार्थ्यांसाठी अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण
- by Yogesh Bandagale
- February 25, 2026
- 30 views
रत्नागिरी, दि. २५ (जिमाका): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान देण्यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या पुढाकारातून दि. २३ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चार दिवसीय अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातील विशेष आकर्षण असलेले High Altitude Balloon (HAB) चे प्रत्यक्ष प्रक्षेपण दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता भाट्ये बीच येथे होणार आहे.
या प्रक्षेपणावेळी विद्यार्थ्यांना फुग्याचे उड्डाण, ट्रॅकिंग प्रणाली, वैज्ञानिक डेटा संकलन तसेच डेटा पुनर्प्राप्ती प्रक्रिया यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ५० ग्रामीण विद्यार्थ्यांना NASA आणि ISRO येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात आले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, या उपक्रमासाठी CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पुढील टप्पा – अंतराळ संशोधनाकडे भक्कम वाटचाल
विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासदौरे नव्हे तर प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळावा, या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात अंतराळ विज्ञानाची मूलतत्त्वे, उपग्रह प्रणाली, कक्षीय रचना, सेन्सर इंटिग्रेशन, उपग्रह मॉडेलिंग, पेलोड इंटिग्रेशन आणि डेटा संकलन याबाबत सैद्धांतिक व प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे.
हा कार्यक्रम सिलिकॉन टेकहिल्स रिसर्च फाउंडेशन, गृहा स्पेस यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असून, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम मानला जात आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची नवी दारे उघडणारा हा उपक्रम त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श मॉडेल म्हणून तो समोर येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
